बाबरी विध्वंसाचा मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात उदोउदो; कुठे आहे कॉमन मिनिमम प्रोग्राम? काँग्रेस नेत्याचाच सवाल

बाबरी विध्वसाबाबत शिवसेनेनं घेतलेल्या जबाबदारीबाबतही मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितलं. त्यावरुन आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनीच मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:46 PM, 4 Mar 2021
बाबरी विध्वंसाचा मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात उदोउदो; कुठे आहे कॉमन मिनिमम प्रोग्राम? काँग्रेस नेत्याचाच सवाल
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई : राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपकडून देशभरात निधी संकलन अभियान सुरु आहे. राम मंदिराच्या नावावर भाजप एक प्रकारे श्रेय लाटत असल्याचा आरोप बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात केला. त्याचबरोबर त्यांनी बाबरी विध्वसाबाबत शिवसेनेनं घेतलेल्या जबाबदारीबाबतही आवर्जुन सांगितलं. त्यावरुन आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनीच मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.(Sanjay Nirupam reminds Congress and NCP leaders of Common Minimum Program)

काय म्हणाले संजय निरुपम?

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील वक्तव्यावरुन एक ट्वीट केलं आहे. त्यात “महाराष्टाच्या मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत बाबरी मस्जिदच्या विध्वंसाचा उदोउदो केला आणि तिथे उपस्थित असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि आमदार भाषणाचा आनंद घेत होते. हा कोणत्या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा भाग आहे? ओवेसी यांनी लावलेल्या विषारी रोपट्याच्या वाढीसाठी यात पुरेसं खतपाणी नाही का?”, असा सवाल निरुपम यांनी केलाय.

सभागृहात मुख्यमंत्री काय म्हणाले?

बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी विध्वंसाच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार टीका केली. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची तुम्ही वेळोवेळी आठवण काढली. त्याबद्दल तुमचे आभार की तुम्ही अजून त्यांना तरी विसरला नाहीत. त्यांना विसरला नसाल तर त्यांचं हिंदुत्व लक्षात ठेवा. ते शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. एक सांगतो तुम्हाला, बाळासाहेब ज्या आक्रमकतेनं उभं राहायचे ना, ती आक्रमकता बाबरी पाडल्यानंतर येडे गबाळे पळून गेले होते. बाळासाहेब एकटे उभे राहिले होते. म्हणजे आता विषय असा झाला आहे की, बाबरी कुणी पाडली? आम्हाला माहिती नाही. बाबरी आम्ही पाडलेली नाही. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं जर ते माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे. नुसता अभिमान नाही तर गर्व आहे. म्हणजे बाबरी पाडली कुणी तर आम्ही नाही पाडली. सहा वर्षे केंद्रात सत्ता असतानाही राम मंदिरासाठी कायदा करा.. कायदा केला नाही. राम मंदिराचा निर्णय कुणी दिला तर सर्वोच्च न्यायालयानं दिला. आता राम मंदिरासाठी घराघरात जाऊन पैसै मागत आहे. पैसे कुणी दिले तर जनतेने दिले. पण आमचं नाव आलं पाहिजे”, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला होता.

निरुपमांकडून कॉमन मिनिमम प्रोग्रामची आठवण!

मुख्यमंत्री सभागृहात भाषण करताना आणि बाबरी विध्वंसाबाबत बोलत असताना सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही मंत्री, आमदार उपस्थित होते. हे मंत्री आणि आमदार मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला बाकं वाजवून दादही देत होते. याच मुद्द्यावरुन आता काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना तयार करण्यात आलेल्या कॉमन मिनिमम प्रोग्रामची आठवण करुन दिली आहे.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उल्लेख केलेला बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय प्रकल्प नेमका काय?

जेव्हा उद्धव ठाकरे फडणवीसांकडे बघून म्हणाले, निर्लज्जपणाने का नाकारता? नेमकं काय घडलं?; वाचा सविस्तर

Sanjay Nirupam reminds Congress and NCP leaders of Common Minimum Program