सरकार पाडतील तेव्हा फडणवीसांचं अभिनंदन करू; राऊतांचा खोचक टोला

सरकार पाडतील तेव्हा फडणवीसांचं अभिनंदन करू; राऊतांचा खोचक टोला
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस जेव्हा सरकार पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदन करु, असा टोला संजय राऊत लगावला (Sanjay Raut answer to Devendra Fadnavis statement).

चेतन पाटील

|

Apr 12, 2021 | 2:46 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी ठाकरे सरकार अस्थिर करण्याबाबतच भाष्य केलं. त्यांच्या याबाबतच्या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस जेव्हा सरकार पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदन करु, असा टोला त्यांनी लगावला. संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्याने प्रत्यक्ष विठोबा माऊलीसुद्धा सावध झाली असेल. विठोबा माऊलीचा आशीर्वाद महाविकास आघाडी सरकारला आहे. माऊलीचा आशीर्वाद नसता तर हे सरकार आलंच नसतं. त्यांनी जर विठोबा माऊलीला साकडं घातलं असेल तर विठोबा माऊली पाहील ना. पण आज जनता कोरोना संकटात सापडली आहे. या काळात सरकार पाडणं, सरकार घालवणं, सरकार अस्थिर करणं या सगळ्यातून बाहेर आलं पाहिजे”, असं मत संजय राऊत यांनी मांडलं.

“मंगळवेडाची किंवा पंढरपूरची पोटनिवडणूक आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तिथे प्रचारासाठी गेलेत. त्यांनी प्रचार करावा. जनता जो काही निर्णय घ्यायचाय तो निर्णय घेईल. पण एक सांगतो, विरोधी पक्षाला अशाप्रकारची भाषणं करावी लागतात. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना लोकांमध्ये विश्वास आणण्यासाठी किंवा त्यांचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी अशा प्रकारची भाषणं करावी लागतात. अशा प्रकारची भाषण आम्हीसुद्धा केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील केली आहेत. राजकारणात अशा भाषणांना जेवढं महत्त्व द्यायचं ते तेवढंच द्यायचं. ते सरकार जेव्हा पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदन करु”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

“सरकारचं काऊंटडाऊन म्हणता येणार नाही. राजकारणात मंत्र्यांचे राजीनामे, सरकारवर आरोप-प्रत्यारोप होणं हे नवीन नाही. फडणवीस सरकार होतं तेव्हासुद्धा अशाप्रकारचे आरोप, मंत्र्यांचे राजीनाम्याच्या घटना घडल्या होत्या. काही मंत्र्यांनी राजीनामे देणं गरजेचं असतानाही राजीनामा देण्यात आला नव्हता. या राजकारणाच्या चालिरिती किंवा परंपरा आहेत. विरोधी पक्ष जे काही बोंबलत फिरतोय त्यामुळे सरकारला धोका आहे, असं मला वाटत नाही”,  अशी भूमिका त्यांनी मांडली.

संजय राऊत 14 एप्रिलला बेळगावात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार

बेळगावा लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी संजय राऊत 14 एप्रिलला बेळगावात जाणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा ते प्रचार करणार आहेत. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, “मी बेळगावात जाणार. आमच्या महाराष्ट्र एककीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारातील सर्व कार्यक्रमात सहभागी होणार”, असं त्यांनी सांगितलं.

“बेळगावशी आणि महाराष्ट्र एककीकरण समितीसोबत भावनिक नातं आहे. सीमाभाग महाराष्ट्रात आलाच पाहीजे, असं आपण बोलतो. आज त्यांना आपली गरज आहे. इथून नुसते फुसके बार सोडून चालणार नाही. तिथे मैदानावर उतरुन मदत करायला हवी. माझं विरोधी पक्षाच्या किंवा सर्वच पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे, आपल्याला त्यांच्यासाठी निदान एकदिवस तरी प्रचारासाठी दिलं पाहिजे. मला त्यांनी आमंत्रण दिलं, मी त्यांना शंभर टक्के येणार, असं सांगितलंय. महाराष्ट्र एकीकरण समितीतच तिथे शिवसेना आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“आम्ही बेळगावात आमच्या उमेदवाराच्या प्रचाराला चाललो आहोत. तिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कसा उद्भवू शकतो? महाराष्ट्रात निवडणुका होतात तेव्हा कर्नाटकचे मंत्री प्रचाराला येतातच ना. तेव्हा कायदा-सुव्यवस्थेचा उल्लेख होतो का? कर्नाटकाच्या नेत्यांना कोणी आडवतं का, मग आम्हाला का आडवता? ते फार तर काय करतील? गोळ्या चालवतील किंवा लाठ्या चालवतील. बेळगावात भाजपचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांना आडवलं तर मी प्रचार करेल”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

संबंधित बातम्या : ‘सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू’ मंगळवेढ्यात फडणवीसांचा सूचक इशारा 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें