शिंदेंच्या 21 आमदारांना परत यायचंय, संजय राऊत यांचं मोठं विधान, महाविकास आघाडी तगण्यावर अजूनही ठाम!

शिंदेंच्या 21 आमदारांना परत यायचंय, संजय राऊत यांचं मोठं विधान, महाविकास आघाडी तगण्यावर अजूनही ठाम!
Image Credit source: tv9 marathi

तब्बल 21 आमदार आमच्या संपर्कात आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही आमदारांचं बोलणं झालंय, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

मंजिरी धर्माधिकारी

|

Jun 23, 2022 | 4:27 PM

मुंबईः एकनाथ शिंदेंनी गुवाहटीतले आमदारांच्या भल्या मोठ्या फौजेसोबतचे फोटो व्हायरल करून आपलं शक्तीप्रदर्शन केलंय. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊतदेखील (Sanjay Raut) आपल्या विधानावर ठाम आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या आमदारांवर दबाव असून त्यांना उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटात यायचंय. त्यांनी स्वतः आमच्याशी संपर्क साधला आहे. उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला अजिबात धोका नाही. सरकार राखण्याएवढं संख्याबळ आमच्याकडे आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी पुन्हा एकदा दाखवलाय. सूरतच्या वाटेवरून परत आलेले आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांचा आज शिवसेनेच्या वतीनं सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सुरुवातीलाच संजय राऊत यांनी हे मोठं वक्तव्य केलं. त्यामुळे 41 पेक्षा जास्त आमदार माझ्या गोटात आहे, असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंचा दावा खरा की खोटा, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.

’21 आमदारांचा आम्हाला फोन’

एकनाथ शिंदे यांच्या गटातील बहुतांश आमदार आमच्या संपर्कात असून त्यांना पुन्हा मुंबईत उद्धव ठाकरेंच्या गटात यायचंय, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. असे तब्बल 21 आमदार आमच्या संपर्कात आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही आमदारांचं बोलणं झालंय, असं संजय राऊत यांनी सांगितलं. कुणी कितीही फोटो आणि व्हिडिओ पाठवावेत. पत्ते खेळताना, खाताना-पिताना. पण ज्या दिवशी ते मुंबईत येतील. त्या दिवशी आमचे होतील. या सगळ्यांशी उद्धव ठाकरेंशी व्यवस्थित संपर्क झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा अंतर्गत संघर्ष कुठेही गेला तरी महाविकास आघाडीसाठीचं पुरेसं संख्याबळ आमच्याकडे आहे, असा दावा संजय राऊत यांनी केलाय.

‘भाजपकडून आमदारांचं अपहरण’

कोणत्या पद्धतीनं राज्यातील शिवसेनेच्या आमदारांचं भाजपने अपहरण केलं आहे. आपल्या कब्जात घेतलं आहे. मी फक्त भाजपचाच उल्लेख करतोय. सत्तास्थापनेसाठी आमदारांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मी त्यासंदर्भात वारंवार बोललो आहे. पण नितीन देशमुख आणि कैलास पाटील हेच या राज्यात कोणत्या प्रकारचं राजकारम सुरु आहे, खरं सांगतील. त्यामुळे त्यांना मी आज सर्वांसमोर आणलं आहे. राजकारणानं किती खालची पातळी गाठली आहे.

42 आमदारांसह एकनाथ शिंदेंचं शक्तीप्रदर्शन

दरम्यान, गुवाहटी येथून एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल होतोय. यात शिवसेना जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. तसेच एकनाथ शिंदेंचाही जयजयकार केला जात आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडणार नसून आम्हीच शिवसेना आहोत, असं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटानं या निमित्तानं ठसवून सांगितलं आहे. त्यामुळे गुवाहटीतून मुंबईत आल्यानंतर हा गट शिवसेना पक्षावर हक्क सांगण्याच्या तयारीत आहे, असंही सांगण्यात येत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें