पंकजांच्या बेरजेच्या राजकारणाला आणखी एक यश, धनंजय मुंडेंना धक्का

पंकजांच्या बेरजेच्या राजकारणाला आणखी एक यश, धनंजय मुंडेंना धक्का

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय. हजारो कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचा संकल्प केला. शिवाय बीडच्या भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना साथ देण्याचं आवाहन हजारो कार्यकर्त्यांना केलं. 18 तारखेला पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले. […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:06 PM

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय. हजारो कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचा संकल्प केला. शिवाय बीडच्या भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना साथ देण्याचं आवाहन हजारो कार्यकर्त्यांना केलं. 18 तारखेला पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले. विशेष म्हणजे 18 एप्रिल रोजी बीड लोकसभेसाठी मतदान आहे.

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचं नेतृत्त्व सध्या धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील ज्येष्ठ नेत्याने विरोधी पक्षाला साथ देणं हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. बीडची जागा धनंजय मुंडेंनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यांचे विश्वासू बजरंग सोनवणेंना त्यांनी निवडणुकीत उतरवलंय. पण बीडमधील पक्षाच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यानेच भाजपच्या उमेदवाराला मदत करण्याचं जाहीर आवाहन केलंय. त्यामुळे धनंजय मुंडेंची अडचण आणखी वाढली आहे. यापूर्वीही विधानपरिषद निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडेंना धक्का बसला होता.

बीडमधील राष्ट्रवादीतील धनंजय मुंडेंवर नाराजांची यादी

राष्ट्रवादी पक्ष म्हणजेच धनंजय मुंडे अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. एवढंच नाही, तर राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांचे जिवलग खंदे समर्थक असल्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर नेते नाराज झाले होते. राष्ट्रवादीकडून गेवराईचे अमरसिंह पंडित यांची वर्णी लोकसभेला लागली होती. मात्र आठ तासांच्या आत त्यांचा पत्ता कट करत बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिल्याने पंडित समर्थक मात्र नाराज झाले. पण अमरसिंह पंडित सध्या राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत.

अंबाजोगाई येथील नंदकिशोर मुंदडा यांनीही बजरंग सोनवणे यांच्यावर नाराजी व्यक्त करत निवडणूक प्रचारापासून अलिप्त राहणं पसंत केलंय. दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर हे देखील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमुळे नाराजी व्यक्त करतात. जयदत्त क्षीरसागर यांनी आता थेट भाजपलाच मदत करा असं जाहीर आवाहन कार्यकर्त्यांना केलंय. यामुळे धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढली आहे. एकीकडे पंडित समर्थक, तर दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर आणि आता तिकडे नंदकिशोर मुंदडा यांच्या नाराजीमुळे राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यातून मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सुरेश धसही भाजपात

जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपात जाण्याचा निर्णय जाहीर केला नसला तरी त्यांनी भाजपला मदतीचं आवाहन केलंय. याच पद्धतीने जिल्हा परिषद निवडणुकीनंतर माजी मंत्री आणि बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांनीही भाजपला मदत केली होती. त्यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते. राष्ट्रवादीचे नेते जाहीर भाजपात प्रवेश करत नसले तरी ते पक्षाविरोधात नाराजी व्यक्त करत भाजपला पक्षात राहून मदत करत आहेत. पंडित, मुंदडा, धस आणि आता क्षीरसागर ही अशी नाराजांची यादी आहे. सुरेश धस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मदत केली आणि त्यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली. त्याचप्रमाणे जयदत्त क्षीरसागर यांनीही पक्षात राहूनच भाजपला मदतीचं आवाहन केलंय.

राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यातील मोठे धक्के

धनंजय मुंडेंचं जिल्ह्यातील राष्ट्रवादीवर वर्चस्व असलं तरी त्यांना प्रमुख वेळी मोठ्या धक्क्यांचा सामना करावा लागला. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर नाराजी व्यक्त करत भाजपला मदत केली आणि भाजपने जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवला. दुसरा धक्का म्हणजे विधानपरिषद निवडणूक. या निवडणुकीत धनंजय मुंडेंनी भाजपचे नेते रमेश कराड यांना उमेदवारी दिली. पण कराड यांनी निर्णय बदलत पुन्हा भाजपातच जाणं पसंत केलं. यावेळी धनंजय मुंडेंवर मोठी नामुष्की ओढावली आणि या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. सुरेश धस हे विधानपरिषदेवर निवडून गेले. आता प्रतिष्ठेच्या बनलेल्या लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना मदत करण्याचं आवाहन केलंय.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीला मोठा धक्का, जयदत्त क्षीरसागरांचा भाजपला जाहीर पाठिंबा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें