
मुंबईत आज विरोधकांच्या वतीने सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या विरोधातील या मोर्चाला राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. या मोर्चावेळी शरद पवारांची गैरसोय झाल्याचे पहायला मिळाले. यामुळे खासदार सुप्रिया सुळे संतापल्या होत्या. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
विरोधकांच्या मोर्चाच्या वेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गैरसोय झाल्याचे पहायला मिळाले. यामुळे खासदार सुप्रिया सुळे संतापल्या होत्या. शरद पवार यांची गाडी निश्चित स्थळी न पोहचल्यामुळे शरद पवार यांच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांवर सुप्रिया सुळे संतापल्याचे दिसून आले. शरद पवार हे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासोबत मोर्चातून चालत आले आणि मंचावर गेले. यानंतर गाडी ठरलेल्या ठिकाणी न पोहचल्याने सुप्रिया सुळे पदाधिकाऱ्यांवर ओरडल्या. शरद पवार डिव्हायडर ओलांडून आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोलीसांशी बोलून गाडी स्टेजच्या मागे लावण्याची व्यवस्था केली.
निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चात बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंधू भगिनी. आजचा मोर्चा मला जुन्या गोष्टी आठवण करून देतो. मला आठवतंय १९७८-८९ या काळात महाविद्यालयात शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात असाच मोर्चा निघाला होता. काळा घोडा आणि त्याचा परिसर तिथे मोर्चे एक प्रकारचा विचार समन्वय दाखवणारे मोर्चे होते. तुम्ही सर्वांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली. त्यातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, त्याची आठवण होते. आज महत्त्वाचा विषय आपण हातात घेतला. आपण स्वतसाठी काही मागत नाही. आपण एवढंच म्हणतोय की लोकशाहीत संविधानाने तुम्हा आम्हाला अधिकार दिला त्याची जतन करणं याची वेळ आली आहे.’
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या. इथे बनावट आधार कार्ड मिळतं. माहिती दिली. कलेक्टरला सांगितलं. सिद्ध करून द्या हे आव्हान आलं. डेमो दाखवला. हे दाखवून हा आरोप ज्याने सिद्ध केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. खोटेपणा उघड करणाऱ्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ शासन या सर्वांना संरक्षण देत आहे. त्यामुळे तुमची माझी जबाबदारी आहे की काहीही करा मतदानांचा हक्क सांभाळा.’