मुख्यमंत्र्यांना सांगा आमच्या बापात दम आहे, दत्तक बापाची गरज नाही, नाशकात पवारांचा हल्लाबोल

फडणवीस, बाड-बिस्तार बांधा 24 तारखेनंतर तुम्हाला नागपूरला परत जायचं आहे, असा इशाराही शरद पवार यांनी दिला

मुख्यमंत्र्यांना सांगा आमच्या बापात दम आहे, दत्तक बापाची गरज नाही, नाशकात पवारांचा हल्लाबोल
| Updated on: Oct 18, 2019 | 8:23 AM

नाशिक : मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं, पण इथे कसलीच प्रगती नाही. मी लोकांना विचारलं तुमचा दत्तक बाप आहे कुठे? या मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची नाशिकला गरज नाही. आमच्या बापात दम आहे असं त्यांना सांगा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा (Sharad Pawar on Devendra Fadanvis) समाचार घेतला. फडणवीस, बाड-बिस्तार बांधा 24 तारखेनंतर तुम्हाला नागपूरला परत जायचं आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

सध्या पैलवानच शिल्लक नाही या मुखमंत्र्यांच्या वक्तव्याला शरद पवारांनी उत्तर दिलं. समोरचा पैलवान तुम्हाला दिसत नाही पण 24 तारखेनंतर तुम्हाला तेल लावलेला पैलवान दिसेल. लक्षात ठेवा मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे. तुम्हाला रेवड्यांवर कुस्ती खेळणारा पोरगाही सरळ करेल, असा टोला यावेळी पवारांनी मुख्यमंत्र्यांना (Sharad Pawar on Devendra Fadanvis) लगावला.

नाशिकमध्ये झालेल्या आघाडीच्या प्रचारसभेत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. अमित शाह यांना पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखत तरी होतं का? गुजरातचे मुख्यमंत्री पंतप्रधान झाले, पाठोपाठ हे गृहमंत्री झाले. मी सात वेळा विधानसभेवर, सात वेळा लोकसभा-राज्यसभेवर निवडून आलो. चार वेळा मुख्यमंत्री झालो. केंद्रीय गृहमंत्रिपद भूषवलं. कृषी खातं मागून घेतलं. काही वर्षांपूर्वी राष्ट्रपतींनी बोलावून मला ‘पद्मविभूषण’ बहाल करणार असल्याचं सांगितलं. मला त्याचा प्रसार करायचा नाही, पण अमित शाह नावाची व्यक्ती राज्यात येऊन विचारते तुम्ही काय केलं? जर मी काहीच केलं नसतं, तर माझा इतका सन्मान झाला असता का? असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला.

पवार कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष, मात्र त्यांनी तयार केलेले पैलवानच पळून गेले : मुख्यमंत्री

आपल्या हवाई दलाने हल्ला केला आणि अमित शाह म्हणतात 56 इंचाच्या छातीमुळे हे घडलं. इंदिरा गांधी पंतप्रधानपदी असताना त्यांनीही लष्कराला हवं ते करण्याची मुभा दिली होती. त्यांनी फक्त पाकिस्तानचा इतिहासच नाही, तर भूगोलही बदलला. पण लष्कराच्या शौर्याचं श्रेय त्यांनी कधी घेतलं नाही, असंही पवार म्हणाले.