
Jayant Patil Big Statement : नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. जयंत पाटील यांना 23 मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण करता न आल्याने त्यांचा पराभव झाला. जयंत पाटील यांना मित्र पक्षांची मतेही मिळाली नाहीत. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. केंद्रातील भाजप सरकार चार महिन्यांतच बदलणार आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
साताऱ्यातील लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि कोयना बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या उद्घाटनाचा सोहळा काल पार पडला. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी केंद्रातील एनडीए सरकारवर जोरदार निशाणा साधला.
येत्या चार महिन्यातच केंद्रातील सरकार बदलणार आहे. पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीतील सरकारमध्ये म्हणजेच केंद्रात जातील. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा अनेक वर्षांचा कार्यकाळ दिल्लीत घालवला आहे. त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला, महाराष्ट्राला होईल. मी इंडिया आघाडीचा एक सदस्य म्हणून हे सांगतोय”, असे वक्तव्य शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केले. जयंत पाटील यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
“पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्य सरकारची हमी दिली. ज्या ठिकाणी यशवंतराव मोहिते आम्हाला कार्ल मार्क्स शिकवायचे त्या ठिकाणी भाजप वाढतेय हे पाहून फार वाईट वाटते”, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
दरम्यान जयंत पाटील हे विधान परिषदेतील सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याबद्दल सर्व पक्षीय नेत्यांमध्ये आदरभाव होता. त्यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंधही होते. जयंत पाटील हे चार वेळा विधान परिषदेवर निवडून आले होते. दोन वेळा निवडणूक होऊन तर दोन वेळा बिनविरोध त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली होती. 24 वर्ष त्यांनी विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे प्रतिनिधीत्व केले होते. पुन्हा पाचव्यांदा विधान परिषदेवर जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र जयंत पाटील यांना 23 मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण करता न आल्याने त्यांचा पराभव झाला.