'ठाण्यात शिवसेना-भाजप युतीला मराठा मोर्चाचा पाठिंबा नाही'

'ठाण्यात शिवसेना-भाजप युतीला मराठा मोर्चाचा पाठिंबा नाही'

ठाणे : मराठा क्रांती मोर्चाने ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. ठाणे मराठा मोर्चाने त्याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. मराठा मोर्चाने पाठिंबा दिल्याचा दावा युतीने काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यावर आता मराठा मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट केली.

“शिवसेना-भाजप युतीने 21 एप्रिल रोजी मराठा क्रांती मोर्चातील पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन, मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने पत्रकार परिषद घेत, युतीला पाठिंबा जाहीर केला. मात्र हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पोखरकर ठाणे लोकसभेला उभे असताना आशा प्रकारची भूमिका घेणे चुकीचं आहे. समाज विनोद पोखरकर यांच्यासोबतच आहेत आणि हीच मराठा क्रांती मोर्चाची अधिकृत भूमिका आहे”, असं ठाणे मराठा मोर्चाने पत्रकाद्वारे म्हटलं आहे.

मराठा क्रांती मोर्चादरम्यान आम्ही 15 दिवस कारागृहात होतो. आमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. जेव्हा आम्ही तुरुगांत होतो तेव्हा कुठे गेलेले हे पळकुटे? असा प्रश्न मराठा समाजाने पत्रकातून उपस्थित केला.

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून विद्यमान खासदार राजन विचारे निवडणूक रिंगणात आहेत. तर  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून आनंद परांजपे मैदानात आहेत.

उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात वॉरंट

दरम्यान, नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात यवतमाळच्या कोर्टाने वॉरंट बजावलं आहे. दोन वर्षापूर्वी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून मराठा समाजाने काढलेल्या मोर्च्याची खिल्ली उडवणारं व्यंगचित्र काढण्यात आलं होतं. त्याविरोधात खटला चालू असल्याने, पुसद कोर्टाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट बजावलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *