बंडखोरी करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याची पदावरुन हकालपट्टी

बंडखोरी करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याची पदावरुन हकालपट्टी

ठाणे : भाजप आणि शिवसेनेला नाशिक आणि भिवंडीत बंडखोरीचं ग्रहण लागलंय. भिवंडी लोकसभा मतदारसंघ युतीत भाजपच्या वाट्याला आहे. इथे भाजपने विद्यमान खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर करताच मित्रपक्ष शिवसेनेचे जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती तथा शिवसेना जिल्हा ग्रामीण सह संपर्क प्रमुख सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या या बंडखोरीनंतर रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पदावरून हकालपट्टी केल्याचे जाहीर करण्यात आलं. त्या पार्श्वभूमीवर सुरेश म्हात्रे हे आपल्या निर्णयावर ठाम असून माझा विरोध भाजपाला नसून शिवसेनेवर सतत अन्याय करणाऱ्या खासदार कपिल पाटील यांना असल्याचं ते म्हणाले.

सुरेश म्हात्रे भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार कपिल पाटील यांच्याशी असलेल्या हाडवैरामुळे सदैव चर्चेत राहिलेले नाव आहे. 2014 च्या निवडणुकीत सुरेश म्हात्रे यांनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली, ज्यामध्ये त्यांना 97 हजार मते मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात बस्तान बसविण्यास सुरवात केली. शिवसेनेकडून भविष्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढविल्या जातील अशी घोषणा होताच सुरेश म्हात्रे यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली. पण युती झाल्यानंतर त्यांची अडचण झाली.

यानंतर सुरेश म्हात्रे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश न करताच काँग्रेसमधील हस्तकांना हाताशी धरून उमेदवारी मिळविण्यासाठी अर्थपूर्ण प्रयत्न केल्याचं बोललं जातं. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत काँग्रेस एबी फॉर्मची उत्सुकता ताणली गेली असताना एबी फॉर्म सुरेश टावरे यांना मिळाल्यामुळे सुरेश म्हात्रे यांना अपक्ष  म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI