कोरोनामुळे आधीच मुडद्यांच्या राशी, दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता? शिवसेनेचा भाजपला सवाल

जीवाची भीक मागणाऱया तृणमूल कार्यकर्त्यांकडे पाहून या मंडळींना आसुरी आनंद मिळाला असता, असा खोचक टोलाही शिवसेनेनं लगावला आहे. (Shivsena on West Bengal Violence)

कोरोनामुळे आधीच मुडद्यांच्या राशी, दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता? शिवसेनेचा भाजपला सवाल
संजय राऊत, ममता बॅनर्जी, पंतप्रधान मोदी

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुका भाजप हरल्यावर तेथे दंगे उसळले. आता प. बंगालातही तेच घडले. देशात कोरोनामुळे आधीच मुडद्यांच्या राशी पडत आहेत. दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता? प. बंगालात शांतता, कायदा–सुव्यवस्था राखणे हे ममता बॅनर्जींइतकेच केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य आहे, याचा विसर कोणाला पडला आहे काय? जेथे भाजपचे लोक निवडून आले आहेत त्याच भागात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत, असे तृणमूलचे म्हणणे आहे. हे खरे असेल तर ममता बॅनर्जी यांना अपशकून करण्यासाठीच बंगालात हिंसाचार घडवला जात आहे काय? असा सवाल शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात पश्चिम बंगालमध्ये घडत असलले्या हिंसाचारबद्दल भाष्य करण्यात आले आहे. (Shivsena Saamana Editorial on West Bengal Violence after election)

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय? 

2019 मध्ये बंगालात भाजपचे 18 खासदार निवडून आले. त्यानंतर जे उन्मादी राजकारण सुरू झाले त्यातून अनेक ठिकाणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले गेले. प. बंगालची ही परंपरा आहे असे म्हणायचे तर मग रवींद्र संगीत, रवींद्रनाथ टागोर, बंगालची साहित्य–संस्कृती, सामाजिक सुधारणांचा प्रवाह, स्वातंत्र्य लढय़ातील क्रांतीची मशाल हे सर्व वाया गेले काय? प. बंगालचा खरा संस्कार हाच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुका भाजप हरल्यावर तेथे दंगे उसळले. आता प. बंगालातही तेच घडले. देशात कोरोनामुळे आधीच मुडद्यांच्या राशी पडत आहेत. दंग्यांचे राजकारण करून देश बदनाम का करता? प. बंगालात शांतता, कायदा–सुव्यवस्था राखणे हे ममता बॅनर्जींइतकेच केंद्रातील सत्ताधाऱयांचे कर्तव्य आहे, याचा विसर कोणाला पडला आहे काय? असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

हिंसाचाराचे खापर ममतांवर फोडले

प. बंगालात नेमके काय सुरू आहे? व जे सुरू आहे त्यामागचे अदृश्य हात कोणाचे आहेत, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. प. बंगालात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यापासून हिंसाचार उसळल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. या हिंसाचारात तृणमूल काँग्रेसचे लोक भाजप कार्यकर्त्यांना जागोजाग बदडत असल्याचे सांगितले जात आहे. तो अपप्रचार आहे. बंगालातील हिंसाचारात आतापर्यंत सतरा जण मरण पावले. त्यात नऊजण भाजपशी संबंधित आहेत. उर्वरित मृत हे तृणमूलचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे हल्ले दोन्ही बाजूंनी सुरू आहेत, पण भाजपचे प्रचारतंत्र जोमात असते इतकेच. अनेकांची डोकी फुटली. घरेदारे जाळण्यात आली, असे भाजपतर्फे प्रसिद्ध केले जात आहे. बंगालातील हिंसाचाराने चिंताग्रस्त झालेल्या पंतप्रधान मोदी यांनी तेथील राज्यपाल जगदीश धनगड यांना फोन करून माहिती घेतली.

भाजपचा एक ज्येष्ठ पदाधिकारी थेट हायकोर्टात गेला आणि बंगालातील हिंसाचारास ममता बॅनर्जी जबाबदार असून राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी केली. हे असे रडीचे खेळ बंगालात सुरू झाले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या हिंसाचाराविरोधात भाजपने मंगळवारी देशभर धरणे आंदोलने केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा हे घाईघाईने कोलकात्यात पोहोचले व त्यांनी हिंसाचाराचे खापर ममतांवर फोडले. डॉ. नड्डा हे संयमी नेते आहेत. त्यांचा पिंड आकांडतांडव करण्याचा नाही, पण बंगालचा पराभव पचवता येत नाही. याचे दुःख त्यांच्या मनात खदखदत असेल तर तो मानवी स्वभाव आहे, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे. (Shivsena Saamana Editorial on West Bengal Violence after election)

हिंसा करा, खूनखराबा करा, पण निवडणुका जिंका

डॉ. नड्डा यांना बंगालातील हिंसाचाराबाबत मानवाधिकाराची आठवण आली. ते सांगतात की, बंगालमध्ये राज्य पुरस्कृत हिंसाचार सुरू असताना अनेक राजकीय पक्ष शांत बसले आहेत. त्याचप्रमाणे देशातील मानवाधिकाराचे ‘चॅम्पियन्स’ या हिंसाचाराविरोधात बोलायला तयार नाहीत. डॉ. नड्डा यांनी मानवाधिकाराची भाषा करून निवडणूक प्रचारातील मढी उकरून काढली ते बरे केले. आज जो हिंसाचार उसळला असल्याचे छाती पिटून सांगितले जाते त्याचे मूळ भाजप नेत्यांच्या निवडणुकीतील चिथावणीखोर वक्तव्यात आहे. बंगालातील भाजप नेत्यांनी प्रचारात ताळतंत्र सोडला होता. हिंसेचे खुले समर्थन हे लोक करीत होते. हिंसा करा, खूनखराबा करा, पण निवडणुका जिंका असे त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना जणू आदेशच होते, असेही शिवसेनेनं यात म्हटलं आहे.

या धमकीचा अर्थ काय समजायचा?

भाजपचे बंगालचे प्रांताध्यक्ष दिलीप घोष हे प्रचार सभांतून जाहीरपणे काय बोलत होते? ते सांगत होते, ‘‘आम्हीच जिंकणार; आम्ही जिंकल्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना रस्त्यांवर कुत्र्यांप्रमाणे गोळय़ा मारू!’’ संसदेचे सदस्य असलेल्या व भाजपचे राज्यातील नेतृत्व करणाऱया दिलीप घोष यांची ही चिथावणी आहे. हेच दिलीप घोष एके ठिकाणी जाहीरपणे सांगतात की, ‘‘डायरीत लिहून ठेवा, तृणमूल कार्यकर्त्यांना आम्ही सोडणार नाही.’’ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भगवी वस्त्रं परिधान करतात ते एक तपस्वी किंवा संन्यस्त वगैरे आहेत हे बाजूला ठेवा, पण एका राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत. हे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात जाऊन धमक्या देतात. बंगालात जाऊन योगी महाराज धमकावतात की, ‘2 मे नंतर तृणमूलचे कार्यकर्ते आमच्याकडे जीवाची भीक मागतील.’ या धमकीचा अर्थ काय समजायचा? म्हणजे भाजपचा विजय झालाच असता तर तृणमूल कार्यकर्त्यांचे रक्ताचे पाट वाहिले असते आणि जीवाची भीक मागणाऱया तृणमूल कार्यकर्त्यांकडे पाहून या मंडळींना आसुरी आनंद मिळाला असता, असा खोचक टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

ममता बॅनर्जींना अपशकून करण्यासाठीच बंगालात हिंसाचार घडवला जातोय का?

राजकारणाचे हे रक्ताळलेले रूप आहे. ही लोकशाही वगैरे नसून ठोकशाही आहे. प. बंगालातील हिंसाचाराचे समर्थन कोणीच करणार नाही. निवडणुका संपल्यावर वैर संपायला हवे, पण ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दुपारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या क्षणापर्यंत राज्यात निवडणूक आयोगाचे, म्हणजे केंद्राचेच राज्य होते व कायदा-सुव्यवस्था केंद्रीय सुरक्षा दलाच्या हातात होती. ममता बॅनर्जी यांना काहीच हालचाल करता येऊ नये म्हणून राज्याच्या पोलीस महासंचालकांपासून अनेक अधिकाऱयांना निवडणूक आयोगाने हटवले. मग राज्यातील हिंसाचाराची जबाबदारी नक्की कोणाची? तृणमूल काँग्रेसची भूमिका वेगळी आहे. भाजपवाले रंगवतात तितके हिंसाचाराचे चित्र भेसूर नाही. जेथे भाजपचे लोक निवडून आले आहेत त्याच भागात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत, असे तृणमूलचे म्हणणे आहे. हे खरे असेल तर ममता बॅनर्जी यांना अपशकून करण्यासाठीच बंगालात हिंसाचार घडवला जात आहे काय? असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.  (Shivsena Saamana Editorial on West Bengal Violence after election)

संबंधित बातम्या : 

Maratha Reservation : मराठा समाजाचं ठरलं, 16 तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार, पहिल्या मोर्चाचं ठिकाणही ठरलं!

Maratha Reservation: पंतप्रधान मोदींनी छत्रपती संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ का दिली नाही; संजय राऊतांचा सवाल

“मराठा आरक्षण हा पेटवापेटवी करण्याचा विषय नाही, राजकीय जोडे बाजूला ठेवून ही लढाई जिंकली पाहिजे”

Published On - 7:35 am, Fri, 7 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI