मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने लेखी आश्वासन द्यावं, शिवसेनेची मागणी

शिवसेनेला भाजपकडून मुख्यमंत्री पदाची लेखी हमी हवी आहे. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडली

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने लेखी आश्वासन द्यावं, शिवसेनेची मागणी

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेमध्ये यंदा 50 टक्के वाटा देण्यात यावा, यासाठी शिवसेनेनं भाजपवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे (Shivsena wants CM post). तसेच, शिवसेनेला भाजपकडून मुख्यमंत्री पदाची लेखी हमी हवी आहे. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडली (Shivsena wants CM post).

विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक ‘मातोश्री’वर आज पार पडली. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thcakeray ) यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. राज्यात युतीचेच सरकार पुन्हा स्थापन करायचे असेल, तर भाजपला शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय पर्याय नाही. यंदा ‘बार्गेनींग पॉवर’ वाढल्याने शिवसेनेनंही भाजपवर दबावतंत्र वाढवलं आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी नवनिर्वाचित आमदारांपुढे भाषणात मांडलेली भूमिका खूप महत्त्वाची आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मातोश्री’वर आले होते. त्यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या सत्तास्थापनेचा 50-50 फॉर्म्युला ठरला होता. म्हणजे 144-144 हे जागा वाटपाचे सूत्र ठरले होते. पण, जागा वाटपावेळी भाजपची अडचण मी समजून घेतली. पण आता आम्हाला सत्तेत 50 टक्के वाटा हवा आहे. भाजप नेत्यांनी ते आम्हाला लेखी मान्य करावं, म्हणजे भविष्यात कुठली अडचण किंवा वाद होणार नाहीत, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंदुत्वाच्या आधारावर ही युती आहे. त्यामुळे युतीचे सरकार स्थापन व्हावे, अन्य उपलब्ध पर्यायांचा विचार करायला लागू नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

बैठकीत नवनिर्वाचित आमदारांनी निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. पण भाजपकडून मागण्या मान्य करून घेण्यासाठी शिवसेना येणाऱ्या दिवसांत दबाव आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्यातील सत्तेत भाजपकडून मिळालेल्या सापत्न वागणुकीची सव्याज परतफेडीची संधी यंदा विधानसभा निवडणुकीच्या निकालातून शिवसेनेकडे आयती चालून आली आहे आणि उद्धव ठाकरे ही संधी सोडतील, अशी चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत.

सत्तेचा फॉर्म्युलाही ठरलाय, युतीचेच सरकार स्थापन करायची भाजप आणि शिवसेना नेतृत्वाची इच्छा आहे. पण एकमेकांप्रती फक्त विश्वासाची कमतरता असल्याने सध्या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय विधाने आणि दबावतंत्राचा माहौल गरम आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI