सोलापुरातील आणखी एका महाराजांची राजकारणात एण्ट्री, काँग्रेसकडून तिकीट मागितलं

खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यानंतर आता आणखी एक महाराज राजकारणात येण्यास उत्सुक आहे. खासदार जयसिदेश्वर शिवाचार्यांचे विश्वासू श्रीकंठ शिवाचार्य हे काँग्रेसकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

सोलापुरातील आणखी एका महाराजांची राजकारणात एण्ट्री, काँग्रेसकडून तिकीट मागितलं

सोलापूर : खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यानंतर आता आणखी एक महाराज राजकारणात येण्यास उत्सुक आहे. खासदार जयसिदेश्वर शिवाचार्यांचे विश्वासू श्रीकंठ शिवाचार्य हे काँग्रेसकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. श्रीकंठ शिवाचार्य हे लोकसभा निवडणुकीवेळी सोलापूरचे भाजप उमेदवार डॉ जयसिदेश्वर शिवाचार्य यांच्यासोबत कायम होते. जयसिद्धेश्वर यांचे विश्वासू सहकारी म्हणून श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी ओळखले जातात. आता त्यांनाही राजकारणाचे वेध लागले आहेत.

श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील मठाचे मठाधिपती आहेत. त्यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. उमेदवारी मागण्यासाठी काँग्रेस भवनात त्यांनी अर्जही केला आहे. त्यामुळे आणखी एका महाराजांचा आता राजकारणात प्रवेश नक्की झाल्याची चर्चा आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले जात आहेत. अक्कलकोट येथील विद्यमान काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यात फारसे इच्छुक नसल्याची चर्चा आहे. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारीही मागितली नाही. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा नागरसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामींच्या कार्यकर्त्यांना आहे.

श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी हे विद्यमान खासदार डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य यांचे अतिशय विश्वासू मानले जातात. लोकसभा निवडणुकीत त्यांना निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे डॉ जयसिदेश्वर महास्वामींना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी, त्यांना मुंबईला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाण्यासाठी श्रीकंठ महास्वामी आग्रणी होते. त्यामुळे आता आणखी एका महाराजांचा राजकारणात प्रवेश जवळपास निश्चित मानलं जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI