रावतेंनी प्लॅन केला, 15 आमदारांसह सभापतींचा रस्ता अडवायचा, हर्षवर्धन पाटलांना गडकरींची साथ, ‘असा केला प्लॅन फेल!’

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 10, 2021 | 8:06 AM

विनाकारण निर्माण होणारा कटुतेचा प्रसंग अतिशय खुबीने हाताळण्यात हर्षवर्धन पाटलांना यश आलं... हा कटुतेचा प्रसंग टाळणं त्यांना शक्य झालं कारण त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध होते...!

रावतेंनी प्लॅन केला, 15 आमदारांसह सभापतींचा रस्ता अडवायचा, हर्षवर्धन पाटलांना गडकरींची साथ, 'असा केला प्लॅन फेल!'
हर्षवर्धन पाटील, नितीन गडकरी, दिवाकर रावते आणि शिवाजीराव देशमुख
Follow us

अक्षय आढाव, टीव्ही 9 मराठी, मुंबई :  विधान परिषदेमध्ये घडलेला हा प्रसंग… विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि शिवसेना गटनेते दिवाकर रावते यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु झाला… या वादाची तीव्रता वाढत गेली… सभापतींनी त्यांना ‘असंसदीय शब्द वापरु नका’ अशी सूचना केली… कदाचित रावतेंना बीपीचा त्रास असावा… त्यामुळे त्यांचा पारा आणखीनच चढला… परिस्थिती स्फोटक बनत चालली होती… जे काही सुरु होते त्यामुळे सभागृहाचे नियम आणि संकेतांची पायमल्ली सुरु होती… खरंतर देशमुख आणि रावते यांच्यातील वाद होता पण तत्कालिन संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटलांनी उभा राहून दिवाकर रावते यांना सांगितले की, “तुम्ही सभागृहाचे सन्माननीय सदस्य आहात… तुम्ही जे बोलत आहात ते अशोभनीय आहे… सभागृहाच्या नियमाविरुद्ध आहे… त्यामुळे कृपा करून तुम्ही असं बोलू नका…”

सभापती शिवाजीराव देशमुखांनी एका दिवसासाठी रावतेंचं निलंबन केलं

दिवाकर रावते यांनी असंसदीय शब्द वापरल्यामुळे सभापतींनी रावतेंना बाहेर जाण्याचे आदेश दिले आणि सभागृह सोडायला सांगितलं… मग मात्र रावतेंचा पारा आणखीनच चढला… आतापर्यंत खाली उभे असलेले रावते चक्क बाकावर उभे राहिले आणि जोरजोरात सभापतींना म्हणू लागले की, “तुम्ही मला बाहेर जा असे आदेश देणारे कोण…?” यावर भडकलेल्या सभापतींनी रावतेंना एका दिवसासाठी निलंबित केलं… त्यामुळे रागाच्या भरात रावते सभागृहाबाहेर गेले आणि सभागृहाचे कामकाज सुरु झाले…

रावतेंनी प्लॅन केला, 15 आमदारांसह सभापतींचा रस्ता अडवायचा!

हर्षवर्धन पाटील यांना वाटलं की सभापतींनी रावतेंना एका दिवसासाठी निलंबित केलंय… तिथेच प्रश्न मिटला… पण असं न होता सभागृहाबाहेर वेगळंच काहीतरी शिजत होतं… हर्षवर्धन पाटील यांना त्यांच्या सचिवाचा फोन आला आणि सांगितलं की रावते सभागृहाच्या गेटवर सभापतींचा रस्ता अडविण्यासाठी 15 आमदार घेऊन बसले आहेत आणि ते सभापती घरी जात असताना त्यांचा रस्ता अडवून त्यांना घराकडे जाऊ देणार नाहीत… दिवाकर रावते यांची कृती कळल्यानंतर हर्षवर्धन पाटील स्वतः सभागृहाकडे गेले तोपर्यंत सभागृहाचे त्या दिवशीचे कामकाज संपलेले होते…

“मी शिवाजीराव देशमुख आहे… त्याच रस्त्याने जाणार”

सभागृहातील बरेचसे सदस्य घराकडे गेले होते… तिथे सभापती एकटेच होते… हर्षवर्धन पाटील त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना विचारलं की, “तुम्ही घरी कधी जाणार आहात…?”, ते म्हणाले “माझ्या समोर जेवढ्या फाईल पडल्या आहेत त्यावर सह्या झाल्या की मग मी घराकडे जाईल…” मग हर्षवर्धन पाटलांनी सभापतींना सांगितलं की, “दिवाकर रावते काही आमदार घेऊन बाहेर गेटवर बसले आहेत… ते तुमच्या रस्ता आडवणार आहेत… हा प्रसंग टाळण्यासाठी आपण रावतेंना सभागृहात बोलावून त्यांच्याशी चर्चा करावी… जेणेकरुन चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल पण सभापती म्हणाले मी शिवाजीराव देशमुख आहे… त्याच रस्त्याने जाणार”

हर्षवर्धन पाटलांनी गडकरींना सोबतीला घेतलं

सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या “त्याच रस्त्याने जाणार” या भूमिकेमुळे हर्षवर्धन पाटलांसमोर प्रश्न पडला की, हा मोठा प्रश्न कसा हाताळायचा…? कारण प्रश्न सुटण्याऐवजी आणखीनच चिघळत चालला होता… मुख्यमंत्र्यांना बोलवायचं तर ते शक्य नव्हतं… मग मात्र हर्षवर्धन पाटील यांनी दृढनिश्चय केला की, आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे… गेटवर बसलेल्या सर्वांवर त्यांनी एकदा नजर फिरवली… त्यामध्ये नितीन गडकरी सुद्धा होते…. हर्षवर्धन पाटलांनी बरोबर हेरलं की गडकरींशी चर्चा होऊ शकते… म्हणून पाटलांनी गडकरींना बाजूला बोलवून घेतलं आणि गडकरींशी चर्चा केली….

गडकरींना समजून सांगितलं की, “तुम्ही सर्वजण अशाप्रकारे सभापतींचा रस्ता अडवला तर समाजामध्ये आणि राज्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल… त्यामुळे तुम्ही पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये या सर्वांना समजावून सांगा… मी स्वतः सभापतींना घेऊन जाणार आहे…” पण गडकरी म्हणाले, “मी रावतेंना आणि या 15 आमदारांना खूप वेळापासून समजावून सांगतोय, पण ते ऐकत नाहीत…” त्या सर्वांना समजावून सांगण्याची जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांनी गडकरींवर सोपवली आणि सभापतींना आणण्यासाठी सभागृहाकडे गेले…

गडकरी-हर्षवर्धन पाटलांनी रावतेंचा प्लॅन फेल केला!

थोड्यावेळाने हर्षवर्धन पाटील सभापतींना घेऊन खाली आले… गेटवर सर्वजण घोषणा देत होते… गडकरींनी पुढाकार घेत त्यांच्या घोषणा थांबवल्या आणि सर्वजण घोळक्याने सभापतींजवळ येऊन चर्चा करू लागले… मग यातून सुटका करण्यासाठी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, “आपण उद्या सभागृहात चर्चा करु… त्याचीच री गडकरींनी ओढली…. तेही म्हणाले, उद्या यावर चर्चा करु… मग सर्वजणांनी घोषणा देण्याचे थांबवले.. आणि सभापतींची गाडी सुखरूपपणे त्यांच्या घराच्या रस्त्याने निघून गेली…!

‘घोषणा देऊन थकला असाल, चला वडापाव चारतो, चहा पाजतो!’

हर्षवर्धन पाटील उपस्थित सर्व आमदारांना मिश्किलपणे म्हणाले, की चला तुम्ही खूप घोषणा दिलेल्या आहेत. त्यामुळे तुमचा घसा कोरडा झाला असेल… म्हणून मी तुम्हाला चहा पाजतो आणि वडापाव चारतो…. सर्वजण चहा आणि वडापावसाठी सोबत गेले… मग हसत खेळत चर्चा सुरु झाली… आतापर्यंत जवळपास सगळ्यांचा राग बऱ्यापैकी कमी झाला होता… चहा झाल्यावर सर्वजण सात वाजता घरी निघून गेले…

विनाकारण निर्माण होणारा कटुतेचा प्रसंग अतिशय खुबीने हाताळण्यात हर्षवर्धन पाटलांना यश आलं… हा कटुतेचा प्रसंग टाळणं त्यांना शक्य झालं कारण त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध होते… जिथे कठोर होणे गरजेचे आहे तिथे कठोर व्हायचं आणि जिथे दोन पावलं मागे जाणं गरजेचं आहे, तिथं दोन पावलं मागं जायचं… हर्षवर्धन पाटील अजूनही हेच तत्व पाळत आहेत…!

हे ही वाचा :

RR आबांकडून डान्सबारविरोधी कायदा, मनजितसिंग म्हणाला, ‘आता आमदारांच्या बायकांनाच नाचवू’, ‘भाऊ-आबांनी’ त्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला!

काँग्रेस आमदारांच्या स्विमिंग पूलमध्ये डुबक्या, धोतरं छत्रीवर वाळत, TV पाहून सोनियांचा विलासरावांना फोन, वाचा काय आहे किस्सा…

Special Story : जेव्हा हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्राचं विधिमंडळ जळण्यापासून वाचविले…!

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI