Supriya Sule: सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात तात्काळ आणीबाणी जाहीर करा; सुप्रिया सुळे यांच्या मागणीने खळबळ

Supriya Sule: मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि मिसिंग लिंकसह अनेक महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी मोठी मागणी केली आहे.

Supriya Sule: सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात तात्काळ आणीबाणी जाहीर करा; सुप्रिया सुळे यांच्या मागणीने खळबळ
Supriya Sule
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 06, 2026 | 1:55 PM

सध्या संपूर्ण राज्याला पावसाने झोडपले आहे. अनेक ठिकाणी पाणी भरले आहे काही ठिकाणी झाडे कोसळून दुर्घटना घडली आहे. मुंबई-पुणे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मिसिंग लिंक प्रकल्प, दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यात आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, राज्यात या पूर्वीही पाऊस झाला आहे. मुंबई-पुण्याला पाऊस नवा नाही. पण असं चित्र पूर्वी कधीच नव्हतं. हे कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत असून हे अतिशय चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने आढावा घेऊन राज्यात आणीबाणी जाहीर करावी. महाराष्ट्राचे नेमकं चित्र काय? यावर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य करणं आवश्यक आहे. असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि मिसिंग लिंकसह अनेक महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत. आळंदीमध्ये पूरस्थिती आहे, रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत आणि रस्ते खचल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी.

मिसिंग लिंक प्रकल्पाचा उल्लेख करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या प्रकल्पाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते आणि सर्वांनी त्याचे स्वागतही केले होते. मात्र, आता या प्रकल्पाशी संबंधित समोर येणारे व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आहेत. या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला, पण त्यातून अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. पुढे त्यांनी या प्रकल्पाचे सेफ्टी ऑडिट झाले होते का? नैसर्गिक आपत्तीचा विचार करून नियोजन करण्यात आले होते का? याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी सुप्रियाताई सुळे यांनी केले आहे.

वसई-विरार, भांडूप, मुंबई आणि इतर भागांत अनेक प्रकल्प सुरू आहेत. मात्र, सुरक्षितता आणि पर्यावरणाचा पुरेसा विचार झालेला दिसत नाही. या सर्व प्रकल्पांवर किती खर्च झाला, सुरक्षा तपासणी झाली का आणि नियोजनात नैसर्गिक आपत्तींचा विचार करण्यात आला होता का, याची पारदर्शक चौकशी व्हावी. राज्यातील अनेक महत्त्वाचे मार्ग बंद आहेत. ताम्हिणी घाट, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि मिसिंग लिंक या तिन्ही मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या दोन प्रमुख शहरांतील संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकाच पावसाने संपूर्ण महाराष्ट्र पॅरालाइज झाल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत एखादा रुग्ण, डॉक्टर, विद्यार्थी किंवा अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे काय, याचाही विचार सरकारने करायला हवा,असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सत्ताधाऱ्यांवर निशाणा

सत्ताधाऱ्यांवर निशाणा साझत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्ताधारी नेते सतत विरोधकांवर कारवाई करण्यात व्यस्त आहेत. मात्र, सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. प्रभू श्रीराम हे देशाच्या श्रद्धेचे केंद्र असून अशा ठिकाणी भ्रष्टाचाराच्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. हा मुद्दा आगामी संसदेच्या अधिवेशनात इंडिया आघाडी ताकदीने मांडेल, तसेच या विषयावर आघाडीच्या बैठकीतही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow Us