मनसे भाजपचे कार्यकर्ते भिडले! मुंबईत चोख पोलिस बंदोबस्त, मोदींचा फोटो हटवल्याने वातावरण तापलं
काल अमित ठाकरे यांनी पुण्यातील एका महाविद्यालयात जात पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला होता. या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत आंदोलन केले होते.

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप युवा मोर्चा आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचे समोर आले आहे. काल अमित ठाकरे यांनी पुण्यातील एका महाविद्यालयात जात पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला होता. या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत आंदोलन केले होते. यावेळी मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याची माहिती समोर आली आहे.
अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
समोर आलेल्या माहितीनुसार, अमित ठाकरेंच्या कृतीविरोधात आज भाजप युवा मोर्चाकडून माहिममध्ये आंदोलन करण्यात येत आहे. भाजप आंदोलक शिवतीर्थाकडे निघाले असता मनसे आणि भाजपचे कार्यकर्ये एकमेकांशी भिडले. सध्या शिवतीर्थ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. तसेत मुंबईच्या आजूबाजूचे मनसैनिक शिवतीर्थाबाहेर जमले आहेत. आता या राड्याप्रकरणी मनसेचे नेते गजानन काळे आणि इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या सुविधांची पाहणी करण्यास गेलेले मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची जोरदार चर्चा होत आहे. या कॉलेजमध्ये गेल्यावर अमित ठाकरे यांनी कँटिनमध्ये मिळणारे जेवण आणि खेळाडूंना प्रशिक्षक मिळत नसण्यावरून कॉलेजच्या अधीक्षक, मुख्याध्यापकांना जाब विचारला. यावेळी एका विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधान मोदींचा फोटो असल्याचे सांगितले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी मोदींचा फोटो काढण्यास सांगितला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्याने तातडीने पंतप्रधान मोदींचा फोटो खाली उतरवला होता. याप्रकरणी आता वादाला सुरुवात झाली आहे.
अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
अमित ठाकरे यांच्यावर आज पुण्यातील महाविद्यालय मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अमित ठाकरे यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. विनापरवानगी महाविद्यालयात घुसल्याने चतुश्रुंगी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
