
“मालवणात काल जे झालं, ते गुंडागर्दी आहे. गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. भाजपाच्या गुंडांनी कोणी आमदार, खासदार असतील, मला त्यात पडायचं नाही. देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, ते पोलिसांना सन्मान मिळवून देऊ शकले नाहीत. त्यांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत. पोलिसांवर फक्त हल्ला करायचच बाकी ठेवलं होतं. हा पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रकार आहे” अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी काल मालवणच्या राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला. “गृहमंत्री काय करतायत? त्यांचं समर्थन करतायत. त्यांची बोलण्याची स्टाईल आहे. मग आमच्यावर का गुन्हा दाखल करता?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
“फक्त शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याचा प्रश्न नसून ही महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार फडणवीसांच्या काळात उद्धवस्त झालेत” असं संजय राऊत म्हणाले. “राष्ट्रभक्ती, राष्ट्रवाद फक्त तोंडी लावण्यासाठी आहे. राष्ट्रभक्तीच्या नावाखाली भाजपाच्या लोकांनी भ्रष्टाचार, व्याभिचार केलाय. आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या व्यवहारात भाजपाने 58 कोटी रुपये खाल्ले. तो चोर तिथे मुलुंडला बसला आहे. गृहमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आयएनएस विक्रांत घोटाळ्याच्या चौकशीची फाईल बंद करण्यावर पहिली स्वाक्षरी केली” असं संजय राऊत म्हणाले.
‘शिवाजी महाराजांसंदर्भात भाजपाच कृत्य अधम आणि नीच’
“हे चोरच आहेत. यांच्यावर काय विश्वास ठेवायचा? यांनी देश विकून खाल्लाय. शिवाजी महाराजांसंदर्भात भाजपाच कृत्य अधम आणि नीच आहे. शिवाजी महाराज असते, तर अशा लोकांचा कडेलोट केला असता” असं संजय राऊत म्हणाले. “मालवणात काल जे झालं, गृहमंत्र्यांनी त्याची शरम वाटली पाहिजे. पोलिसांना शिव्या घातल्या, त्यांची कॉलर पकडली. तुमच्या काळजाला धक्का नाही बसला” असं संजय राऊत म्हणाले.
‘तो महाराष्ट्राचा बाप आहे’
बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यांसदर्भात संजय राऊत म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंचे वडिल नाहीत, तो महाराष्ट्राचा बाप आहे. नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतीत इतकी नमकहरामी दाखवत असतील, तर यापेक्षा दुर्देव नाही. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी राणेंना मुख्यमंत्री केलं, पद, प्रतिष्ठा दिली. त्यांच्या पुतळ्यापर्यंत येणार असतील, तर यांच्यासाठी जोडे मारा आंदोलन योग्य आहे” “बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यामुळे यांच्या पोटात एवढं दुखत असेल, तर अफजल खानाप्रमाणे यांच्या पोटाचं ऑपरेशन करावं का?” असं संजय राऊत म्हणाले.