नाना पटोले यांना न्यायालयाची चपराक

नाना पटोले यांना न्यायालयाची चपराक


नागपूर : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चपराक लगावली आहे. नाना पटोले यांची मॉक पोलसाठी 60 मतं देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे 11 तारखेला होणाऱ्या मतदानापूर्वी फक्त 50 मॉकपोलिंग होणार आहे. शिवाय स्ट्राँगरुमच्या सीसीटीव्हीचे फुटेज देण्याची नाना पटोले यांची मागणीही न्यायालयाने फेटाळली आहे.

नागपूर मतदारसंघातून भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसकडून नाना पटोले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे नाना पटोले कुठल्या ना कुठल्या कारणाने भाजपवर, भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधत असतात. काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी निवडणुकीसाठी आणलेल्या ईव्हीएम मशिन स्ट्राँगरुममध्ये ठेवताना तिथले सीसीटीव्ही बंद ठेवण्यात आल्याचा आरोप भाजपवर केला होता. तसेच ज्या ट्रकमध्ये ईव्हीएम मशिन आणण्यात आल्या त्यावर भाजपचे झेंडे असल्याने ईव्हीएम मशिनसोबत छेडछाड करण्यात आली असावी, अशी शक्यता पटोलेंनी व्यक्त केली होती. तसेच या प्रकरणाची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी अशी मागणीही केली होती.

यानंतर पटोलेंनी मतदानापूर्वी मॉक पोलसाठी 60 मतं देण्याची मागणी केली होती. तसेच, त्यांनी ईव्हीएम मशिन ठेवतानाच्या स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही फुटेजचीही मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांच्या या दोन्ही मागण्या फेटाळून लावल्या आहेत.

रविवार सुट्टीचा दिवस असतानाही उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याप्रकरणी सुनावणी झाली. जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वत: न्यायालयात बाजू मांडली, अशी माहिती एमसीएमसी समितीचे सदस्य राहुल पांडे यांनी दिली.

मॉक पोल म्हणजे काय?

मॉक पोल हे मतदान प्रक्रियेत होणारं पहिलं मतदान आहे. याची गणना मतदानात होत नाही. मॉक पोलनंतर ईव्हीएममधील नोंदी अधिकारी डिलीट करतो. ईव्हीएम मशिन सुरु आहेत, की नाही हे तपासण्यासाठी हा मॉक पोल घेतला जातो. ईव्हीएमद्वारे मतांची योग्य नोंदणी होत आहे की नाही, यासाठी हे मॉक पोल महत्त्वाचं असतं. ईव्हीएमवर झालेल्या नोंदी नष्ट केल्यानंतर प्रत्यक्षातील मतदान घेतलं जातं. त्यानंतर या मॉक पोलसंबंधीचा अर्ज भरण्यात येतो, यात कुणाच्या उपस्थितीत मॉक पोल केलं, याची माहिती संबंधित अधिकाऱ्याला त्या अर्जात लिहावी लागते. त्यानंतर मतदानाला सुरुवात होते.

पाहा व्हिडीओ :

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI