ज्यांनी मोदींना साताऱ्याचा पेढेवाला म्हणून हिणवलं, त्यांना मोदी समजलेत का? : संजय राऊत

एनडीए कुणाची जहागीरदारी नाही. शिवसेना ही एनडीएच्या संस्थापकांपैकी एक आहे, असं संजय राऊत म्हणाले.

ज्यांनी मोदींना साताऱ्याचा पेढेवाला म्हणून हिणवलं, त्यांना मोदी समजलेत का? : संजय राऊत


मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर कमबॅक केलं आहे. अँजिओप्लास्टीनंतर संजय राऊत (Sanjay Raut Narendra Modi)  आज ‘सामना’च्या कार्यालयात रुजू झाले. यावेळी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली.  महाराष्ट्राच्या मनातली गोड बातमी मिळणार आहे. नवीन राजकीय मेन्यू आहे, त्यामुळे प्रक्रियेला थोडा वेळ लागतो आहे, पण बातमी मिळेल हे नक्की, असं संजय राऊत (Sanjay Raut Narendra Modi) म्हणाले.

आज उद्धव ठाकरेंसोबत राजकीय चर्चा झाली, प्रकृतीविषयी चर्चा झाली, व्यक्तीगत चर्चा झाली, कौटुंबिक चर्चा झाली, पालक आहेत ते, अशा चर्चा होत असतात, असं राऊतांनी सांगितलं.

एनडीएच्या बैठकीला आमच्याकडून कोणी उपस्थित राहिल असं मला वाटत नाही आणि मला असंही वाटत नाही की आम्हाला आमंत्रण येईल. त्यामुळे या गोष्टी गृहीत धरुन पुढची पावलं टाकावी लागतील. खरं म्हटलं तर एनडीएतून बाहेर पडण्याचं तसं कारण नव्हतं आम्हाला, पण ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची, स्वाभिमानाची होती.  आमच्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना जर कोणी खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असेल, तर महाराष्ट्राची जनता ते सहन करणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

एनडीए कुणाची जहागीरदारी नाही

एनडीएमध्ये राहायचं की नाही, कुणी ठेवायचं की नाही हा निर्णय घेणारी यंत्रणा कुठली आहे? एनडीए कुणाची जहागीरदारी नाही. शिवसेना ही एनडीएच्या संस्थापकांपैकी एक आहे, असं संजय राऊत म्हणाले.

मोदी समजायला भाजपची गरज नाही

“मोदी समजून घ्यायला आम्हाला भाजपच्या नेत्यांची गरज नाही, आज जे नेते मोदींविषयी बोलत आहेत, ते अस्तित्वातही नव्हते तेव्हापासून शिवसेना आणि मोदींचे संबंध आहेत. मोदींना साताऱ्याचा पेढेवाला अशी पदवी देणारे नेते तुमच्या मांडीवर बसतात, त्यांना मोदी समजलेत का? मोदींवर प्रखर नाही तर अत्यंत खालच्या स्तरावर टीका करणारे हे तुमच्या पक्षात येऊन महत्त्वाची पदं भूषवतात. त्यांना मोदी कळलेत का? बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आम्ही सर्वांनी अडचणीच्या काळात मोदींची पाठराखण केली आणि कवचकुंडल म्हणून काम केलं आहे. तेव्हा सर्व शेपटा घालून पळून गेले होते”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

तेव्हा भाजपने सत्तास्थापन का केली  नाही?

जेव्हा राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं होतं, तेव्हा त्यांचं सरकार का आलं नाही, तेव्हा त्यांना सरकार बनवायला हरकत नव्हती. आम्ही वारंवार सांगत होतो, सर्वात मोठ्या पक्षाला बोलवा, मग तेव्हा त्यांनी बगला वर का केल्या? आमच्याकडे बहुमत नाही असं का सांगितलं आणि आता राष्ट्रपती राजवट आणल्यानंतर बहुमत कसं आणणार?  कुठून आणणार, बहुमत विकत घेणार आहेत का? जशी इतर काही ठिकाणी घेतली, अशी प्रश्नांची सरबत्ती राऊतांनी केली.

सरकार आमचंच येणार या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी समाचार घेतला. “लोकशाही आहे, घटना, संविधान हा प्रकार जर राज्यामध्ये असेल, तर हे वक्तव्य जे आहे माजी मुख्यमंत्र्यांचं ते अत्यंत गांभीर्याने घ्यायची गरज आहे”, असं राऊत म्हणाले.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI