‘अरे जरातरी लाजा!’, वाडेश्वर कट्ट्यावरील फराळ पार्टीला तृप्ती देसाईंचा विरोध

| Updated on: Oct 27, 2022 | 1:31 PM

दिवाळी फराळानिमित्त सर्वपक्षीय राजकीय नेते वाडेश्वर कट्ट्यावर जमले या फराळ पार्टीवर तृप्ती देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अरे जरातरी लाजा!, वाडेश्वर कट्ट्यावरील फराळ पार्टीला तृप्ती देसाईंचा विरोध
Follow us on

पुणे : पुणे… महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. संस्कृती आणि परंपरांचा दाखला द्यायला असेल तर आपसूकच पुण्याचं नाव तोंडी येतं. इतर परंपरांप्रमाणे इथली राजकीय संस्कृतीही प्रगल्भ आहे. सगळे राजकीय हेवेदावे विसरून पुण्यातील राजकीय मंडळी वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र येतात. यंदाही दिवाळी फराळानिमित्त सर्वपक्षीय राजकीय नेते वाडेश्वर कट्ट्यावर (Wadeshwar Katta) जमले आणि त्यांनी फराळाचा आस्वाद घेतला. या फराळ पार्टीवर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

माजी आमदार विनायक निम्हण यांचं काल निधन झालं. त्याचा धागा घरत तृप्ती देसाई यांनी या वाडेश्वर कट्ट्यावर टीका केलीय. “काल माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन झाले होते.  हा कार्यक्रम पुढे ढकलला जाऊ शकला असता. त्यांना दिलेला अग्नी अजूनही शांत झालेला नसताना हे जे झालं त्याचा निषेध आहे. राजकारणी इतके निर्लज्ज कसे असू शकतात”, अशी टीका तृप्ती देसाई यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

विनायक आबांवर जी वेळ आली ती सर्वांवरच एक दिवस येणार आहे परंतु राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात हाच मोठा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्तीला पडलेला आहे, असं म्हणत तृप्ती देसाई यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

पुण्यात आज वाडेश्वर कट्टयावर सर्वपक्षीय राजकीय नेते पुणेरी दिवाळी फराळ केला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, शहरातील सर्व आमदार, राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष सहभागी झाले होते. माजी महापौर अंकुश काकडे आणि श्रीकांत शिरोळे यांच्याकडून या वाडेश्वर कट्ट्याचं आयोजन केलं जातं. यंदाही दिवाळी निमित्त सर्व पक्षीय नेते वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र आले.