उद्धव ठाकरेंच्या हाती स्टिअरिंग, महाराष्ट्राचं स्टिअरिंगही हाती धरणार?

उद्धव ठाकरे मालाडमधील हॉटेल 'द रिट्रीट'वर असलेल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत बैठक घेण्यासाठी स्वतः कार चालवत गेले

उद्धव ठाकरेंच्या हाती स्टिअरिंग, महाराष्ट्राचं स्टिअरिंगही हाती धरणार?

मुंबई : शिवसेनेचं स्टिअरिंग हाती धरलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः कार चालवत ‘मातोश्री’ निवासस्थानावरुन मढला रवाना झाले. उद्धव ठाकरे मालाडमधील हॉटेल ‘द रिट्रीट’वर असलेल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरेही सोबत होत्या. गाडीचं स्टिअरिंग स्वतःच्या हाती धरणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Drives Car) महाराष्ट्राचं स्टिअरिंगही हाती धरणार का? असा सवाल शिवसैनिकांच्या मनात आहे.

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी करणारे पोस्टर्स आदल्या रात्रीच ‘मातोश्री’बाहेर लागले होते. त्यामुळे आधी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करणारे शिवसैनिक आता उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी जोर धरताना दिसत आहेत. शिवसैनिकांच्या मनातली मागणी उद्धव ठाकरे पूर्ण करणार का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

शिवसेना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. परंतु शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी वारंवार होते. त्याचप्रमाणे गटनेतेपदी निवडलेले गेलेले एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याही नावाची चर्चा होताना दिसते.

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा, ‘मातोश्री’बाहेर पोस्टरबाजी

आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री उशिरा हॉटेल ‘द रिट्रीट’मध्ये शिवसेना आमदारांची भेट घेतली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही आमदारांसोबत हॉटेलमध्येच मुक्काम केला. शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांची एकत्रित सोय केलेली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल चढवला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांचाही संताप पाहायला मिळाला.

‘चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यासाठी मी लाचार नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचं वचन दिलं होतं. ते मी पूर्ण करणार. त्याच्यासाठी भाजप, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

‘शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून चर्चा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. फडणवीस यांनी आत्ता जाहीर करु नका, वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेन, असं म्हटलं. तसेच आत्ता सांगितलं तर पक्षात माझी अडचण होईल असं नमूद केलं होतं. ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला.’ असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला होता.

मी खोटारडा म्हणून शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही. जमत नाही असं म्हटलं तर एकवेळ ठीक आहे. पण ठरलंच नाही, हा आरोपी मी सहन करणार नाही. खोटं बोलण्याचा हिशोब काढला तर अच्छे दिन, नोटबंदीपासून कोण खोटं बोललं हे दिसेल, असा संतापही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला (Uddhav Thackeray Drives Car) होता.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI