जर विठ्ठलच सगळं करणार असेल तर तुम्ही सत्तेत का? पायउतार व्हा : विनायक मेटे

| Updated on: Jul 01, 2020 | 4:32 PM

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, वीज बिल, मराठा आरक्षण या सर्व घडामोडींवरही मेटेंनी भाष्य केलं. (Vinayak Mete Criticizes Thackeray Government)

जर विठ्ठलच सगळं करणार असेल तर तुम्ही सत्तेत का? पायउतार व्हा : विनायक मेटे
Follow us on

नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. बळीराजाला सुखी कर, कोरोनाचे संकट दूर कर अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठू माऊलींच्या चरणी केली. यावरुन शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “जर विठ्ठल सगळं करणार असेल तर तुमची गरज काय?” असा प्रश्न विनायक मेटे यांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, वीज बिल, मराठा आरक्षण या सर्व घडामोडींवरही मेटेंनी भाष्य केलं. (Vinayak Mete Criticizes CM Uddhav Thackeray Government)

“जर विठ्ठल सगळं करणार असेल तर तुमची गरज काय? विठ्ठल सगळं करणार असेल तर उद्धव ठाकरे यांनी सरकारवरून पाय उतार व्हावं. हे निराशावादी सरकार आहे. त्यांनी सगळं देवावर सोडलं आहे. त्यांना सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही,” अशी टीका विनायक मेटे यांनी केली.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात ठाकरे सरकार फेल

“महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना आणि काळजी घेण्यात अपयशी ठरले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात ठाकरे सरकार सपशेल फेल ठरले आहे. या काळात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकारने खाजगी रुग्णालय ताब्यात घ्यावी. त्यांनी चाचण्या कमी केल्या आणि रुग्ण संख्या कमी दाखविण्याकडे जास्त लक्ष दिलं आहे,” अशीही टीका विनायक मेटेंनी केली.

घरगुती विज बिलं माफ करण्याची मागणी

राज्यामध्ये वाढलेल्या वीज बिलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर “व्यावसायिक बिलं सोडून घरगुती बिलं माफ करण्याची मागणी मेटेंनी केली. सगळ्यांचे पैसा येणं थांबल आहे. घराचा खर्च वाढला आहे. रिडींग बंद करून सरासरीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिलं दिलं आहे. अक्षरशः लूट चालू आहे. त्यावर सरकार पाठीशी घालत आहे,” असे ताशेरेही मेटेंनी सरकारवर ओढले. (Vinayak Mete Criticizes CM Uddhav Thackeray Government)

कृषीमंत्री आतापर्यंत झोपले होते का?

“सध्या राज्याच्या कृषी खात्याची अवस्था आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशी झाली आहे. कृषीमंत्री दादा भुसे आतापर्यंत झोपले होते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. कृषीमंत्र्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं, पुढे काय केलं. प्रसिद्धीच्या हव्यासा करता त्यांनी अशी नाटकं करू नये. शेतकऱ्यांच्या मुलगा आहोत आणि म्हणून कृषी मंत्री झालोय हे त्यांनी कामातून सिद्ध करून दाखवावं,” असेही मेटे यावेळी म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra Corona Update | राज्यात 4,787 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 74 हजार 761 वर

शिवस्मारक आणि अण्णासाहेब पाटील मंडळाकडे सरकारचे दुर्लक्ष

“शिवस्मारकाबाबत एकही बैठक नाही. त्याबाबत या सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे. त्या कार्यालयाच्या जागेवर अतिक्रमण व्हायला लागलं आहे. तर दुसरीकडे अण्णासाहेब पाटील मंडळाकडेही या सरकारने लक्ष दिलेले नाही. एक पैसासुद्धा कुणाला दिलेला नाही २५ हजार देण्याची विनंती करतो, पण त्यावरही लक्ष नाही. मोठा मार्ग बंद केला,” असेही मेटे म्हणाले.

मराठा समाजाकडे सरकारचं दुर्लक्ष

“मराठा आंदोलनात अनेकांवर केसेस झाल्या त्याबाबत काही निर्णय घेत नाही. अनेक केसेस तश्याच पडून आहे. ज्यांचं बलिदान दिले त्यासाठी तत्कालीन मदत करण्याची घोषणा केली. मात्र त्याबद्दल हे सरकार काहीच करत नाही. कोपर्डीच्या बहिणीला न्याय अजून नाही. मराठा समाजाच्या विरोधात हे सरकार असल्यावाटून राहत नाही. या सरकारमधील मराठे नेते 2014 च्या आधी चुका करत होते. ते आता सहा महिन्यांत सुरू झाल्या,” असेही मेटे यावेळी म्हणाले.

“मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवर चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणं अशक्य आहे. मेडिकल प्रवेशाबाबतच सुनावणी घ्यायला पाहिजे,” अशी राज्य सरकारला विनंती मेटेंनी केली आहे. “उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांनी लक्ष दिलं पाहिजे. या सरकारने एकही बैठक घेतली नाही, मराठा समाजाकडे अत्यंत दुर्लक्ष केलं आहे,” अशी टीकाही विनायक मेटेंनी यावेळी केली.

“सरकारने गांभीर्याने काही पाऊलं उचलली नाही, तर मग मराठा समाजाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय न्याय मिळणार नाही. झोपेचं सोंग घेतलं असेल तर त्यांना जाग करावं लागेल,” असेही मेटे म्हणाले.

आम्ही इंदुरीकर महाराजांसोबत 

“इंदुरीकर महाराज यांच्यावर खटला दाखल करणे चुकीचं आहे. काही चुकीच्या गोष्टी बाजूला ठेवायला पाहिजे. यापूर्वी अशी अनेकांनी विधान केली, बागेतील आंबे खाल्ली तर मुलं होतात बोललं आहे, त्यावेळी काही करत नाही. महाराजांना टार्गेट केलं जातं आहे. त्यांना बदनाम करण्यामागे षड्यंत्र रचलं जात आहे. त्याला सरकार बळी पडत आहे, आम्ही सगळे महाराजांच्या सोबत आहोत,” अशी भूमिका मेटेंनी मांडली. (Vinayak Mete Criticizes CM Uddhav Thackeray Government)

संबंधित बातम्या :

Ashadhi Ekadashi | पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा

वर्क फ्रॉम होममुळे वीजेचा वापर वाढला, प्रत्यक्ष रिडिंग घेऊ, तक्रारीसाठी ई-मेल आयडी : ऊर्जामंत्री