छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, विनायक मेटेंची विनंती

राज्यातील सर्वच समाज घटक उदयन महाराजांच्या नेतृत्वात काम करतील, असे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, विनायक मेटेंची विनंती

बीड : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाच्या अनेक संघटना, पक्ष आपापल्या परीने संघर्ष करत आहेत. भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, अशी विनंती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. (Vinayak Mete requests Udayanraje Bhosale to lead Maratha Reservation Issue)

“मराठा समाजातील सर्वच घटकांना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोबत घ्यावे. समाजाच्या भल्यासाठी आरक्षणा संदर्भात पुढील दिशा ठरवून नेतृत्व करावे. राज्यातील सर्वच समाज घटक त्यांच्या नेतृत्वात काम करतील. त्यामुळे उदयन महाराजांनी धुरा सांभाळावी” असे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे.

“मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटना, नेते, पदाधिकारी, मान्यवर मंडळीनी आपापली मतं, रोष व्यक्त केला आहे. मात्र एकमेकांना पूरक नसलेली किंवा एकवाक्यता नसलेले विचार दिसतात. मराठा समाजाचे आरक्षण अबाधित राहावे यासाठी काय काय भूमिका घ्यावी, मग आंदोलनाबाबत असो, न्यायालयात असो किंवा सरकारविरोधात, भूमिका घेण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेणे आवश्यक आहे” असे विनायक मेटे म्हणाले.

“या जगात छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. त्यांचे 13 वे वंशज छत्रपती उदयनजी महाराज यांनी पुढाकार घ्यावा. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटनांना उदयनराजे भोसले यांनी एकत्र करावे. मराठा समाजाचे सारथी, बलिदानांना न्याय मिळण्यासाठी नियोजन करावं, पुढची भूमिका ठरवावी आणि ते लवकरात लवकर करावे” असं विनायक मेटेंनी म्हटलं आहे.

“सरकारने आयटीआयपासून अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापकीय, आर्किटेक्चर, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास, विविध पदविका अभ्यासक्रमापर्यंत मराठा समाजातील मुला मुलींच्या शिक्षणाचा सर्व खर्च आणि फी सरकारने भरावी” अशी मागणीही मेटेंनी केली.

“राज्य सरकारने आरक्षणावर लवकर निर्णय घ्यावा, समाजाला न्याय द्यावा; अन्यथा समाजाला रस्त्यावर पुन्हा उतरण्याशिवाय पर्याय नसेल” असा इशाराही मेटेंनी दिला.

(Vinayak Mete requests Udayanraje Bhosale to lead Maratha Reservation Issue)

Published On - 1:08 pm, Wed, 16 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI