शरद पवारांची रोहित आणि पार्थ पवारांसोबत चर्चा, वेगवेगळ्या चर्चांना उधाण; त्या फोटोचा नेमका अर्थ काय?

पार्थ पवार, शरद पवार, रोहित पवार चर्चा करत असल्याचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. याच फोटोबाबत आता नवी मांडणी करण्यात येत आहे.

शरद पवारांची रोहित आणि पार्थ पवारांसोबत चर्चा, वेगवेगळ्या चर्चांना उधाण; त्या फोटोचा नेमका अर्थ काय?
parth pawar and rohit pawar and sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 07, 2026 | 9:14 PM

Parth Pawar Sharad Pawar Photo : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एका फोटोची खूप चर्चा होत आहे. या फोटोमध्ये खासदार शरद पवार, आमदार रोहित पवार, दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे एकत्र बसून चर्चा करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शरद पवार जे सांगत आहेत, ते रोहित पवार आणि पार्थ पवार हे अगदी लक्षपूर्वक ऐकत असल्याचे दिसत आहे. हा फोटो पाहून शरद पवार हे पवार कुटुंबात पुन्हा एकदा मार्गदर्शकाच्या भूमिकेत गेले आहेत, असेही म्हटले जात असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीच्या चर्चेला नव्याने सुरूवात झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार, पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या एका फोटोचा अर्थ काय आहे? याबाबत राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी सविस्तर मांडणी केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर चांगलंच होईल, असं दोन्ही राष्ट्रवादीच्या आमदारांचं मत असल्याचे ते म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

सध्याच कयास लावणे योग्य नाही

सध्या राज्यात जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे सगळीकडे दुखवटा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या सगळीकडे महाराष्ट्रभर त्यांचा मृत्यू हा चर्चेचा विषय आहे. अशा स्थितीत दहाव्याचा कार्यक्रम असेल किंवा इतर काही कारण असेल यामुळे संयोग सोसायटीमध्ये पवार कुटुंबातील सर्व लोक एकत्र आले असतील. त्यामुळे या फोटोबाबत लगेच काही कयास लावणे योग्य नाही, असे मत संजीव उन्हाळे यांनी व्यक्त केले.

आमादारांना वाटते की…

पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही भाष्य केलं. सगळा पवार गट म्हणतोय की विलीनीकरणाची चर्चा झाली होती. 12 फेब्रुवारी रोजी विलीनीकरण होईल, असे सांगण्यात आले होते, असा दावा केला जातोय. तर या सर्व दाव्यांत काहीही तथ्य नाही. या सर्व चर्चा वदंता आहेत, असे अजित पवार यांच्या गटाकडून सांगितले जात आहे. मला असं वाटतं की एकत्रीकरणावरून अजित पवार यांचा गट किंवा त्या गटाचे काही कारभारी यांचा वेगळा विचार असला राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित राहणे हे आवश्यक आहे, असे आमदारांना वाटते, असे मत उन्हाळे यांनी व्यक्त केले.

तोपर्यंत लोकांमध्ये चर्चा होणारच

महाराष्ट्राचा विचार, महाराष्ट्राचा संस्कार असं सांगतो की कुटुंब एकत्र राहिले पाहिजेय कुटुंबात फूट झाली तर ती काही योग्य नाही. त्यामुळे सहयोग सोसायटीमध्ये शरद पवार यांचे जाणे आणि सगळ्या नातवांनी एकत्रित येणे हे संयुक्तिक कारण ठरलं तो फोटो देखील बराचसा व्हायरल होत आहे. आज रोहित पवार यांनी सांगितलं दहा तारखेला अपघाताबाबत विवेचन करणार आहे. बारा तारखेला एकत्रीकरणाबाबत सांगणार आहे. तेव्हा दहा आणि बारा तारखेनंतर मला असं वाटतं की या दोन्ही प्रकरणाचा उलघडा हळूहळू महाराष्ट्राला होईल. तोपर्यंत सध्या एकत्रीकरण असो की अपघात असो लोकांमध्ये चर्चा होणारच आहे, असे विवेचन उन्हाळे यांनी केले.