Sachin Ahir: सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ का सोडली? त्या खासदाराच्या बंडानंतर… मोठी माहिती समोर

Sachin Ahir: त्या खासदाराच्या बंडानंतर सचिन अहिर यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑफर आली होती. आता त्यांनी ठाकरेंची साथ का सोडली? याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

Sachin Ahir: सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ का सोडली? त्या खासदाराच्या बंडानंतर... मोठी माहिती समोर
Sachin Ahir
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 30, 2026 | 1:01 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का दिला आहे. शिवसेना UBT गटाचे आणि ठाकरेंचे विश्वासू समजले जाणारे विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी पक्षाला रामराम ठोकला असून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ का सोडली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सचिन अहिर हे शिवसेना UBT गटाचे विधान परिषद आमदार आहेत. विशेष म्हणजे, वरळी मतदारसंघात त्यांची मजबूत पकड मानली जाते. त्यांच्या या अनपेक्षित पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटात खळबळ माजली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून शिंदे गटाकडून सचिन अहिर यांना पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात येत होती. खासदार संजय पाटील यांच्या प्रवेशानंतर आता सचिन अहिर यांनीही शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. उपसभापती पदाची संधी देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

उपसभापती पदासाठी निवडणूक कधी?

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी २९ जून रोजी सभागृहात घोषणा करताना उपसभापती पदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली. १ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता ही निवडणूक होणार आहे.

अर्ज भरताना उपस्थित

सचिन अहिर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. या उपस्थितीमुळे घटनेचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

वरळी मतदारसंघात मोठा फटका

वरळी मतदारसंघात ठाकरे गटाकडे दोन विधान परिषद आमदार होते, त्यापैकी एक सचिन अहिर. कामगार संघटना आणि स्थानिक स्तरावर त्यांची चांगली पकड आहे. त्यांच्या जाण्याने उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या गटाला वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे.

शिंदे गटाची वाढती ताकद

सचिन अहिर यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची विधान परिषदेतील ताकद आणखी वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी ‘धक्कातंत्र’ वापरत ठाकरे गटाला सतत लक्ष्य करत असल्याचे दिसत आहे.
ठाकरे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हे फेरबदल पुढील काळात मोठे राजकीय बदल घडवू शकतात.

Follow Us