कधी झुकायचं, कधी गप्प राहायचं, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चाणक्यांचे हे 3 नियम लक्षात ठेवा
आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार आयुष्यात ‘या’ 3 गोष्टींपासून नेहमी दूर राहिले पाहिजे. असे केल्याने नात्यांपासून मानसिक शांततेपर्यंत मिळेल फायदा. जाणून घ्या सविस्तर

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये आयुष्यात अनेकदा अशा परिस्थिती निर्माण होतात, जेव्हा नेमकं कुठे झुकावं आणि कुठे आपल्या भूमिकेवर ठाम राहावं, हे समजत नाही. एखादी छोटीशी चूक नात्यात दुरावा निर्माण करू शकते तर निरर्थक वादामुळे वेळ आणि मानसिक शांतता दोन्ही वाया जाऊ शकतात. अशा प्रसंगी आचार्य चाणक्यांच्या नीतीतील विचार योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात.
चाणक्य नीती केवळ यश, संपत्ती किंवा राजकारणापुरती मर्यादित नाही. माणसाचा स्वभाव, नातेसंबंध, आत्मसन्मान आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याबाबतही त्यात अनेक व्यावहारिक विचार सांगितले आहेत.
चूक झाली तर अहंकार बाजूला ठेवा
माणसाकडून चूक होणं स्वाभाविक आहे. मात्र चूक लक्षात आल्यानंतर ती स्वीकारण्याचं धैर्य असणं महत्त्वाचं आहे. आपल्या एखाद्या शब्दामुळे किंवा कृतीमुळे जवळच्या व्यक्तीला दुखावलं असेल तर अहंकार बाजूला ठेवून माफी मागायला हवी.
अनेकदा ‘माफी मागितल्याने आपलं महत्त्व कमी होईल’ या गैरसमजामुळे व्यक्ती आपल्या चुकीवर ठाम राहते. मात्र अशा हट्टामुळे चांगली नातीही कायमची तुटू शकतात.
प्रत्येक वाद जिंकणं गरजेचं नाही
आयुष्यात प्रत्येक चर्चेत किंवा वादात आपणच जिंकलं पाहिजे असं नाही. काही नाती ही कोणत्याही वादातील विजयापेक्षा अधिक मौल्यवान असतात. कुटुंबातील व्यक्ती किंवा जिवलग मित्रासोबत एखाद्या गैरसमजामुळे दुरावा निर्माण झाला असेल तर अहंकार बाजूला ठेवून संवाद साधण्याचा प्रयत्न करावा.
मात्र नातं टिकवण्यासाठी नम्र होणं आणि वारंवार अपमान सहन करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नातं जपण्याची इच्छा दोन्ही बाजूंनी असेल तर संवादासाठी एक पाऊल पुढे जाणं हा मोठेपणा आहे.
विनाकारण वाद घालणाऱ्यांपासून दूर राहा
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं किंवा प्रत्येक मुद्द्यावर वाद घालणं ही शहाणपणाची खूण नाही. काही व्यक्तींना सत्य किंवा तोडगा यापेक्षा स्वतःचं म्हणणं योग्य सिद्ध करण्यातच रस असतो. अशा लोकांसोबत अनावश्यक चर्चा केल्याने आपला वेळ आणि ऊर्जा वाया जाते.
सोशल मीडियावरही अशा निरर्थक वादांचा अनुभव अनेकदा येतो. त्यामुळे आपली भूमिका स्पष्टपणे मांडल्यानंतर प्रत्येक चर्चेला उत्तर देत बसण्यापेक्षा शांत राहणं अधिक योग्य ठरू शकतं.
डिस्क्लेमर : हा लेख आचार्य चाणक्य यांच्या नीतीविचारांवरील लोकप्रिय व्याख्या आणि सामान्य जीवनानुभवांवर आधारित आहे. त्यामुळे वैयक्तिक किंवा सामाजिक नात्यांबाबत अंतिम निर्णय घेताना परिस्थितीचा विचार करून स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करावा.
