Chanakya Niti: ‘या’ 2 गोष्टींसाठी माफी मागण्यात काहीच गैर नाही, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, काय म्हणतात चाणक्य?
Chanakya Niti: अनेकांचा स्वभाव असा असतो की, चूक असेल तरी माफी मागणार नाही. पण आचार्य चाणक्य म्हणतात, काही अशा गोष्टी आहेत, ज्यासाठी माफी मागणं गैर नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, त्या गोष्टीबद्दल आचार्य चाणक्या काय म्हणतात जाणून घ्या...

Chanakya Niti: जगातील महान विद्वान, तत्त्वज्ञ आणि मुत्सद्दी आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या ‘चाणक्य नीति’मध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या रोजच्या आयुष्यात महत्त्वाच्या ठरतील. त्यांच्या ‘चाणक्य नीती’मध्ये त्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवण्याचे मार्ग सांगितले आहेत. आयुष्यात काही प्रसंगी, ठाम राहावं की माघार घ्यावी, याबद्दल आपल्या मनात शंका निर्माण होऊ शकते. कधीकधी, आपल्या लहान चुकासुद्धा मोठी नाती बिघडवू शकतात. त्याचप्रमाणे, अनावश्यक वादविवाद आपला वेळ आणि मनःशांती वाया घालवू शकतात. म्हणूनच, चाणक्य नीती सांगते की, चूक झाल्यास अहंकार बाजूला ठेवून ती स्वीकारली पाहिजे. त्याचबरोबर, चाणक्य असाही सल्ला देतात की, जिथे आत्मसन्मानासाठी वारंवार वाद घालावा लागत असेल, अशा ठिकाणांपासून दूर राहणेच योग्य आहे. तर जाणून घ्या चाणक्य काय म्हणाले.
तुमच्याकडून चूक झाल्यास तात्काळ माफी मागा : आपल्या चुका मान्य केल्यानं कोणाचाही आत्मसन्मान कमी होत नाही. आपल्या शब्दांनी किंवा कृतींनी जर दुसऱ्या कोणाला दुखावलं गेलं असेल, तर ते मान्य करून माफी मागणं अधिक चांगलं आहे. असे काही लोक आहेत जे आपली चूक माहीत असूनही अहंकारापोटी गप्प राहतात. या लोकांना वाटतं की माफी मागितल्याने त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल.
तडजोड करणं चुकीचं नाही : प्रत्येक वाद जिंकण्याचा आग्रह धरण्याची गरज नाही. अनेकदा, वाद जिंकण्यापेक्षा नातेसंबंध टिकवणं अधिक महत्त्वाचं असतं. जर भूतकाळातील छोट्या गैरसमजांमुळे कुटुंबातील सदस्य किंवा मित्र आपल्यापासून दूर जात असतील, तर आपण तो प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
तुमचा आत्मसन्मान गमावू नका : चूक असेल तर माफी मागा पण आत्मसन्मान कधीच गमावू नका. नातं टिकवण्यासाठी तडजोड करणे आणि सततचा अपमान सहन करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आचार्य चाणक्य सांगतात की, जर दोन्ही पक्षांना नातेसंबंध पुढे चालू ठेवायचे असतील, तर थोडे मागे हटून, शांतपणे बोलून समस्या सोडवणं कधीही चांगले आहे.
(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
