
कावड यात्रा श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते, जी कृष्ण चतुर्दशीपर्यंत चालू राहते. यावर्षी कावड यात्रा 11 जुलै 2025 पासून सुरू होत आहे. या प्रवासाचे मुख्य कारण भगवान शंकर यांना प्रसन्न करणे आहे. महादेवाच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कृपेने, कावड यात्रेकरू मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त करतात.
या कावड यात्रेत तुम्हाला बहुतेक कावड यात्रेकरू हे भगवे कपडे परिधान केलेले दिसतील. तुम्हाला माहिती आहे का भगव्या रंगाचे कपडे परिधान करण्यामागचे कारण काय आहे? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला या भगव्या रंगामागील धार्मिक आणि आध्यात्मिक कारण सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात…
भगवा हा त्याग आणि तपस्येचे प्रतीक आहे
भगवा रंग हा सेवा, त्याग, तप, दृढनिश्चय, श्रद्धा, ध्यान आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सनातन धर्मात साधू आणि संन्यासी या रंगाचे कपडे परिधान करत असतात. तर दुसरी कडे असे ही मानले जाते की भगवे कपडे परिधान करणाऱ्या व्यक्तीला सांसारिक आसक्ती आणि भ्रमाच्या पाशातून मुक्तता मिळाली आहे. ती व्यक्ती आता देवाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे.
कावड यात्रेचा उद्देश केवळ नदीतून पवित्र पाणी घेऊन येणे आणि शिव मंदिरात शिवलिंगावर जलाभिषेक करणे असे असले तरी या यात्रेत शुद्धता आणि स्वच्छता देखील आवश्यक असते. या यात्रेदरम्यान तंबाखू, गुटखा, सिगारेट इत्यादी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन केले जात नाहीत.
भगव्या रंगामुळे आत्मविश्वास वाढतो
या कावड यात्रेदरम्यान यात्रेकरूना ब्रह्मचर्य पाळावे लागते आणि मांसाहारापासून दूर राहावे लागते. त्यामुळे यात्रेकरू भगवान महादेवाच्या भक्तीच्या मदतीने शारीरिक आणि मानसिक आव्हानांवर मात करतात. यामध्ये भगवा रंग त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत करतो.
म्हणूनच कावड यात्रेदरम्यान भाविक भगव्या रंगाचे कपडे परिधान करतात. या काळात ते कठोर तपस्या करत असतात. या तपस्यादरम्यान हा रंग त्यांना त्यांची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवण्यास प्रेरित करतो.
भगवा रंग एकतेचे प्रतीक आहे
कावड यात्रा ही गट तयार करून काढली जाते कारण शिस्त, सेवाभाव आणि समर्पणाशिवाय ती कठीण होईल. तसेच भगवा रंग हा एकतेचा प्रतीक देखील आहे. या कारणास्तव भगव्या रंगाचे कपडे त्यांना एकजूट ठेवतात आणि त्यांच्यात धार्मिक जाणीवेची भावना देखील जिवंत ठेवतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)