Vastu Tips : किचनमध्ये चुकूनही ठेवू नका या 6 वस्तू, वास्तुशास्त्रानुसार घरात येते नकारात्मक ऊर्जा
वास्तुशास्त्रानुसार घरातील किचनचा संबंध सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो. मात्र, स्वयंपाकघरात काही वस्तू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, अशी मान्यता आहे. कोणत्या ६ गोष्टी किचनमध्ये ठेवणे टाळावे हे जाणून घेऊया.

घरातील स्वयंपाकघर हे केवळ जेवण बनवण्याची जागा नसून त्याचा संबंध घरातील सुख-समृद्धीशीही जोडला जातो. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही वस्तूंचा घरातील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो. अनेकदा आपण नकळत अशा काही वस्तू स्वयंपाकघरात ठेवतो, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, असे मानले जाते. त्यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार, कोणत्या ६ गोष्टी स्वयंपाकघरात ठेवणे टाळावे, जाणून घेऊया.
मळलेले पीठ
अनेक जण पोळ्या बनवण्यासाठी पीठ मळून फ्रिजमध्ये किंवा स्वयंपाकघरात रात्रभर ठेवतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार असे करणे शुभ मानले जात नाही. मळलेले पीठ जास्त वेळ ठेवणे टाळावे. असे केल्याने राहू आणि शनीचा नकारात्मक प्रभाव वाढू शकतो, अशी मान्यता आहे. तसेच घरातील सकारात्मक ऊर्जेवरही परिणाम होतो.
कचरापेटी
काही लोक स्वयंपाकघरातच कचरापेटी ठेवतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कचरापेटी ठेवणे टाळावे. स्वयंपाकघरात कचरा साचल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते, अशी मान्यता आहे. त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे आणि कचरापेटी स्वयंपाकघरापासून शक्यतो दूर ठेवावी.
तुटलेली किंवा चिरा गेलेली भांडी
किचनमध्ये तुटलेली किंवा चिरा गेलेली भांडी ठेवू नयेत. अनेकदा भांडी तुटल्यानंतरही आपण ती फेकून न देता वापरत राहतो. मात्र, वास्तुशास्त्रानुसार अशी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतात. तसेच यामुळे सुरू असलेल्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात, असे म्हटले जाते.
औषधे
काही लोकांना किचनमध्ये औषधे ठेवण्याची सवय असते. मात्र, वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात औषधे ठेवणे योग्य मानले जात नाही. यामुळे घरातील सदस्यांच्या, विशेषतः घरातील प्रमुख व्यक्तीच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे औषधे स्वयंपाकघराऐवजी स्वतंत्र जागी ठेवावीत.
आरसा
काही जण स्वयंपाकघराची सजावट करण्यासाठी आरशाचा वापर करतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरसा लावणे शुभ मानले जात नाही. आरशामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि घरातील सुख-शांतीवर परिणाम होऊ शकतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे स्वयंपाकघरात आरसा लावणे टाळावे.
रात्री खरकटी भांडी ठेवणे
रात्री स्वयंपाकघरात खरकटी भांडी तशीच ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार, रात्रभर स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. तसेच देवी लक्ष्मी नाराज होऊन घरातील आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करून भांडी घासून ठेवावीत.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
