धनत्रयोदशीला यम दीप का लावतात? हा दिवा कसा लावावा अन् शुभ मुहूर्त काय?
धनत्रयोदशीला धन्वंतरीसाठी तसा दिवा लावला जातो. त्याचसोबतच यमराजासाठी 'यम दीप' लावला जातो. हा दिवा लावण्याची परंपरा खूप जुनी आहे. हा दिवा का लावावा आणि कसा लावावा हे जाणून घेऊयात.

आज ( 18 ऑक्टोबर ) धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान गणेश आणि कुबेर यांचीही पूजा केली जाते. तसेच या दिवशी एक खास दिवा लावला जातो तो म्हणजे यमाचा दिवा. हा दिवा मृत्युदेवता यमराजासाठीही लावला जातो. पद्मपुराण आणि स्कंद पुराणातही याचा उल्लेख आहे. श्रद्धेनुसार धनत्रयोदशीच्या प्रदोष कालात यमचा दिवा लावला जातो. हा दिवा लावल्याने अकाली मृत्युचा धोका टळतो असं म्हटलं जातं. हा दिवा कसा लावावा आणि कधी लावावा हे जाणून घेऊयात.
यमाचा दिवा कसा लावावा?
यमदीप लावण्यासाठी चार बाजू असलेला मातीचा दिवा घ्यावा. मोठा दिवा निवडावा. तो काही तास पाण्यात भिजवा. यामुळे दिवा जास्त वेळ चालतो. दिवा वाळल्यानंतर दिव्यात चारही टोकांना वाती ठेवाव्यात. नंतर, दिव्यात मोहरीचे तेल घालून प्रदोष काळाच्या वेळी, दिवा लावावा आणि तो दक्षिणेकडे तोंड करून ठेवावा. या वेळी यम दीपदान मंत्राचा जप ही करावा.
यमाचा दिवा लावण्याची दुसरी पद्धत
यमाचा दिवा लावण्याची अजून एक पद्धत आहे. ती म्हणजे तुम्ही मातीच्या दिव्याऐवजी कणकेचा दिवाही बनवू शकता.जसं की पिठाचा चार तोंडी दिवा करावा त्यात मोहरीचे तेल घालून त्यात दोन किंवा चार वाती लावून दिवा लावावा. मग त्या दिव्याची हळद- कुंकू, अक्षता व फुलांनी पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवावा.
यम दीपदानासाठी शुभ मुहूर्त
यम दीपदान करण्याचा शुभ काळ संध्याकाळी आहे. संध्याकाळी 5. 48 ते 8:20 वाजेपर्यंत हा दिवा लावावा. या शुभ काळात यम दीपदान करणे शुभ मानले जाते. हे दीपदान जीवनातील अनेक अडथळे देखील दूर करते. ज्या घरात यम दीपदान केले जाते त्या घरातील सर्व सदस्यांचे दीर्घायुष्य, आरोग्य, आनंद आणि समृद्धी देखील वाढवते.
दिवा लावताना खालील मंत्राचा जप करावा
यम दीपदानासाठी मंत्र
मृत्युना पाशहस्तेन कळेन भर्य साहा । त्रयोदशी दीपदानात सूर्यजः प्रेयतामिठी ।
ज्यांना मंत्र म्हणायचा नसेल त्यांनी फक्त हात जोडून प्रार्थना केली तरी चालणार आहे .
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
