
हिंदू धर्मात गणपती हे आराध्य दैवत आहे. कोणत्याही पूजेपूर्वी किंवा शुभ कार्यात गणपतीचं पूजन केलं जातं. त्यामुळे गणपती बाप्पांचं स्थान किती मोठं आहे ते कळतं. अशा या लाडक्या गणपती बाप्पााच्या आगमनासाठी भाविक सज्ज झाले आहे. यंदाची भाद्रपद महिन्यातील शुक्ल पातील गणेश चतुर्थी 27 ऑगस्टला आहे. या दिवशी गणपतीचं घरी पूजन केलं जाईल. त्यानंतर हा उत्सव दहा दिवसांपर्यंत चालेल. अनंत चतुर्दशीला संपेल. असं सर्व असताना भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला चंद्राला पाहण्यास मनाई असते. खरं तर इतर दिवशी चतुर्थीला चंद्राचं दर्शन करून उपवास सोडण्याची प्रथा आहे. चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय व्रत पूर्णत्वास जात नाही. पण भाद्रपद महिन्यातील चतुर्थी वेगळी आहे. धार्मिक मान्यतेनुसार,भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला चंद्र पाहिला तर व्यक्तीवर खोटा आळ येतो. पण असं का ते समजून घ्या. गणेश चतुर्थीला चंद्राकडे का पाहू नये, जाणून घ्या सविस्तर त्या मागची कथा.
धार्मिक मान्यतेनुसार, गणेश चतुर्थीला चंद्र पाहिल्याने सदर व्यक्तीवर दोष किवा खोटा आळ येऊ शकतो. पौराणिक कथेनुसार, एकदा गणपती बाप्पा आपलं वाहन असलेल्या उंदरावर बसून खेळत होते. तेव्हा त्याचा तोल गेला आणि गणपती बाप्पा खाली पडले. तेव्हा चंद्राने हा प्रकार पाहिला आणि हसू लागला. त्यामुळे गणपती बाप्पा नाराज झाले. चंद्राला हसताना पाहून त्यांना राग आला. त्यांनी रागाच्या भरात चंद्राला श्राप दिला. जो कोणी भाद्रपद चतुर्थीला तुला पाहील त्याला खोट्या आरोपाचा सामना करावा लागेल.
एका कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाने गणेश चतुर्थीला चुकून चंद्राकडे पाहिलं होतं. तेव्हा त्यांच्यावर स्यामंतक मणी चोरीचा आळ लागला होता. श्रीमद् भागवत कथेत याचा उल्लेख आहे. भगवान श्रीकृष्णाला या आरोपातून मुक्त होण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.
जर भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला तुम्ही चुकून चंद्र पाहिला तर घाबरून जाऊ नका. चंद्रदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय करू शकता. भगवान श्रीकृष्णाचा नामजप करा. गणपतीची आराधना आणि व्रत ठेवा. ‘सिंह: प्रसेन मण्वधीत्सिंहो जाम्बवता हत: सुकुमार मा रोदीस्तव ह्येष: स्यमन्तक:’ या मंत्राचा जप करा.
(Disclaimer: या बातमीत दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. TV9 मराठी त्याची पुष्टी करत नाही.)