Ganesh Chaturthi 2025: या पद्धतीने करा गणपतीची प्राण प्रतिष्ठापना, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजेची योग्य पद्धत
महाराष्ट्रात मोट्या भक्तिभावाने गणेशोत्सव सण साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला गणपती बाप्पाचं आगमन होतं. तसेच प्राण प्रतिष्ठापना करून आपल्या इच्छेनुसार गणपती दीड, पाच, गौरी गणपती, सात किंवा 11 दिवसांचा ठेवला जातो. चला जाणून घेऊयात प्राणप्रतिष्ठापना कशी करायची ते...

आपल्या लाडक्या गणपती बाप्पााच्या आगमनाची आतुरता लागून आहे. लहानमोठ्यांना गणपती बाप्पा कधी आपल्या घरी येतो असं झालं आहे. दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीची प्राण प्रतिष्ठापना केली जाते. यंदा ही तिथी 27 ऑगस्टला येत आहे. म्हणजेच गणेशोत्सवाला 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पुढचे दहा दिवस म्हणजेच अनंत चतुर्थीपर्यंत हा उत्सव असणार आहे. या काळात बाजारात लगबग असते. लाडक्या गणपती बाप्पाासाठी आधीच सजावट वगैरे केली जाते. गणपती बाप्पांची मूर्ती एकदा का घरी आली की त्याची प्राण प्रतिष्ठापना कधी होते असं होतं. पण या दिवस पूजा करणाऱ्यांसाठी खूपच धावपळीचा असतो. त्यामुळे पूजा करणारे मिळणं कठीण होतं. त्यामुळे अनेक जण स्वत: पूजा करतात. तुम्हालाही पूजा करायची असेल तर विधी आणि मुहूर्त जाणून घ्या.
गणपती प्राण प्रतिष्ठापना आणि मुहूर्त
गणपतीची प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी मध्यान्ह वेळ सर्वात प्रभावी मानली जाते. कारण गणपतीचा जन्म हा मध्यान्ह काळात झाला होता. गणेश जयंती नसली तरी अनेक जण हा मुहूर्त पाळतात. पण तु्म्ही 27 ऑगस्टला ठरल्यावेळी विधी करू शकता.
गणपती प्राण प्रतिष्ठापना विधी
गणपतीची पूजा सुरु करण्यापूर्वी आवाहन करा. गणपतीची प्रतिकृती म्हणून सुपारी समोर ठेवा आणि तिचं पूजन करा. तीन वेळा पाणी ताम्हणात सोडा. त्यानंतर तीनवेळा आचमन करा. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीसमोर आवाहन मुद्रा करा. आवाहन मंत्र पठण करताना गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करावी.ॐ भूर्भुवः स्वः गणेशाम्बिकाभ्यां नमः, सुप्रतिष्ठितो भव, प्रसन्नो भव, वरदा भव। या मंत्राचं पठण करा. मंत्र पठण करताना आसनासाठी भगवान गणेशाला पाच फुले अर्पण करा. जास्वंदाचं फूल गणपतीला प्रिय आहे. ते फूल असल्यास उत्तम राहील. मंत्र पठण करताना भगवान गणेशाचे पाय धुण्यासाठी त्यांना पाणी अर्पण करा.आचमनासाठी भगवान गणेशाला पाणी अर्पण करा.
आचमन समर्पणानंतर मंत्रांचे पठण करताना सुपारीरुपी गणपतीला पाण्याने स्नान घाला. पाण्याने स्नान केल्यानंतर, पंचामृताने गणपतीला स्नान घाला. त्यानंतर गणपतीला दुधाने स्नान घाला. दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल आणि शुद्ध पाण्याने गणपतीला स्नान घाला.मोळीच्या स्वरूपात कपडे अर्पण करा, पवित्र धागा अर्पण करा, सुगंधित पदार्थ अर्पण करा, संपूर्ण तांदळाचे दाणे अर्पण करा. सुपारी तसेच मुख्य गणपतीच्या मूर्तीला फुलांचा हार, शमीची पाने, दुर्वा अर्पण करा. तिलक लावण्यासाठी गणपतीला कुंकू अर्पण करा, गणपतीला धूप दाखवा. दिवा लावा आणि आरती करा. त्यानंतर नैवेद्य अर्पण करा.
