
मागच्या दोन आठवड्यांपासून भारताची प्रसिद्ध क्रिकेटपटू स्मृती मानधना सोशल मिडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आहे. याचं कारण आहे 23 नोव्हेंबरला तिचं अचानक रद्द झालेलं लग्न. लग्नाला अवघे काही तास उरले असताना अचानक हे लग्न रद्द करण्यात येत असल्याच जाहीर करण्यात आलं. लग्नाच्या दिवशी अचानक दुपारच्या सुमारास स्मृतीच लग्न असलेल्या फार्म हाऊसवर रुग्णावाहिका आली. लग्नासाठी केलेलं सर्व डेकोरेशन काढण्यात आलं. स्मृतीच्या वडिलांना सांगलीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकची लक्षण दिसून आली. त्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं.
स्मृतीचे वडिल रुग्णालयात असल्यामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आल्याच सुरुवातीला सांगण्यात आलं. पण दोनच दिवसात स्मृती मानधनाच्या एका कृतीमुळे सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली. स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाच्या विधीचे सर्व व्हिडिओ, पोस्ट डिलिट केल्या. त्यामुळे लग्नाच्या काहीतास आधी दोन्ही कुटुंबात काहीतरी बिघडल्याची चर्चा सुरु झाली. स्मृतीच्या वडिलांना ज्या दिवशी रुग्णालयात दाखल केलं. त्याचदिवशी पलाशला सुद्धा त्रास झाल्याने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबईत आल्यानंतरही पलाश रुग्णालयात होता.
मला हा विषय इथेच संपवायचाय
या दरम्यान काही चॅट्स लीक झाले. काही मुलींची नाव पलाशशी जोडण्यात आली. लग्न मोडण्यामागे हे एका कारण असल्याची सोशल मीडियात चर्चा होती. पलाशच्या कुटुंबियांनी त्यांच्याबाजूने काही गोष्टी सावरण्याचा प्रयत्न केला. पण आज अखेर स्मृती मानधनाने लग्न रद्द केल्याचं जाहीर केलं आहे. कुठल्याही मुलीच्या आयुष्यात लग्नाच्या काही तास आधी असा प्रसंग घडणं ही खूप मोठी बाब आहे. कुटुंबाची, आई-वडिलांच्या प्रतिष्ठेचा विषय असतो. अशावेळी योग्य भूमिका घेण्यासाठी धाडस लागतं. ते स्मृतीने दाखवलं. लग्नाला काही तास उरले असताना तिने लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला. हे लग्न का मोडलं? त्यामागे काय कारण आहेत? हे स्मृतीने स्पष्ट केलेलं नाही. मला हा विषय इथेच संपवायचा आहे असं तिने म्हटलं आहे.
स्मृती पुन्हा बॅट हातात घेणार का?
खासगी आयुष्यात एवढ सगळं घडून गेल्यानंतर स्मृती मानधना पुन्हा बॅट हातात पकडणार का? अशी तिच्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे. या प्रश्नाचं उत्तर हो, असच आहे. मी सर्वोच्च स्तरावर देशाचं प्रतिनिधीत्व करणार असं स्मृतीने म्हटलं आहे. शक्य आहे तो पर्यंत भारतासाठी खेळून जास्तीत जास्त ट्रॉफी जिंकण्याचा माझा प्रयत्न आहे. कायम माझा फोकस तोच असेल हे स्मृतीने स्पष्ट केलय.