
टीम इंडियाने पुन्हा एकदा टी20 वर्ल्ड कप जिंकून सगळ्या देशाला आनंदाचे क्षण दिले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा सामना झाला. भारतीय टीमने न्यूझीलंडवर एकतर्फी अंदाजात विजय मिळवत रेकॉर्ड तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. यावेळी टीम इंडिया जिंकल्यानंतर कुठलीही विक्ट्री परेड काढलेली नाही. त्यामुळे खेळाडू आपपाल्या घरी परतलेत. टीम इंडियाच्या सगळ्या स्टार्सच घरी जोरदार स्वागत झालं. तेच टीमच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारा एक खेळाडू थर्ड एसीच्या कोचमध्ये लपून अहमदाबादमधून निघाला.
सर्वांपासून लपून-छपून ट्रेन मधून घरी जाणारा हा खेळाडू अजून कोणी नसून टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये 8 चेंडूत 25 धावा करणारा ऑलराऊंडर शिवम दुबे आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तातून हा मजेशीर किस्सा समोर आलाय. रिपोर्टनुसार, भारतीय टीमने किताब जिंकल्यानंतर काही तासांनी शिवम दुबे मुंबईतील आपल्या घरी रवाना झाला. हैराण करणारी बाब म्हणजे प्लेनने मुंबईला जाण्याऐवजी तो ट्रेनने गेला. याचं कारणही तसच खास आहे.
असा निर्णय का घेतला?
रिपोर्ट्नुसार अहमदाबादमध्ये फायनल झाल्यानंतर शिवम दुबे पत्नी आणि एका मित्रासोबत मुंबईला जाण्याची तयारी करु लागला. पण त्यावेळी अहमदाबादवरुन मुंबईला जाणारी सर्व फ्लाईट्स पॅक होती. तिकिट मिळत नव्हती. अशावेळी त्याने ट्रेनने जाण्याचा निर्णय घेतला. तिथेही फर्स्ट एसी ऐवजी थर्ड एसीची तिकिट मिळाली. त्याने 3 तिकिट बुक केल्या व गुपचूप रेल्वे स्टेशनवर आला.
त्यावेळी नाही सांगितलं
ट्रेनमधून प्रवास करताना शिवम दुबेला सहज लोकांना ओळखता आलं असतं. म्हणून त्याने टोपी घातली. चेहऱ्यावर मास्क लावला आणि मग स्टेशनला गेला. स्टेशनवर फॅन्सची मोठी गर्दी असल्याने त्याने पत्नी आणि मित्राला आधी पुढे पाठवलं. ट्रेन रवाना होण्याच्या पाच मिनिटं आधी स्टेशनवर पोहोचून ट्रेन पकडली. तिथून थेट वरच्या बर्थ वर जाऊन झोपला. इतकचं नाही, तिकिट चेकर आला, त्यावेळी शिवम दुबेचं नाव वाचून त्यालाही आश्चर्य वाटलं. ज्यावेळी त्याने विचारलं की हा क्रिकेटर आहे का? त्यावेळी पत्नी अंजुमने नाही उत्तर दिलं.
घरी येण्याची इतकी घाई का केली?
त्यानंतर कुठल्याही अडचणीशिवाय शिवम दुबे आरामात ट्रेन मध्ये झोपून मुंबईला परतला. मुंबईच्या बोरिवली स्थानकात लोक त्याला ओळखतील ही भिती होती. त्यावेळी त्याने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. दुबे ट्रेनने येतोय याचं पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर पोहोचून त्याला संरक्षण दिलं. अशा पद्धतीने तो सुरक्षित घरी पोहोचला. शिवम त्याच्या दोन्ही मुलांना भेटायला आतूर झालेला म्हणून तो थांबला नाही. तडक मिळेल त्या साधनाने निघून आला.