बारामती : बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर पहिल्यांदाच रणजी सामना (Baramati Stadium Ranaji Trophy) खेळवला जात आहे. महाराष्ट्र आणि उत्तराखंड या संघांदरम्यान सुरु असलेल्या सामन्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. बारामतीत रणजी सामना होत असल्यामुळे ग्रामीण भागातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक मेजवानीच आहे.
बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर रणजी सामने खेळण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने परवानगी दिल्यानंतर आज पहिल्यांदाच बारामतीत रणजी सामना होत आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड असा रणजी सामना रंगणार आहे.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या सामन्याला सुरुवात करण्यात आली. पुढील काही वर्षांत आणखी काही सामने या स्टेडियमवर खेळवले जाणार असल्याचंही पवारांनी यावेळी सांगितलं.
‘बारामतीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर आज महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या रणजी सामन्याचे उद्घाटन करताना समाधान वाटले. प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देशांत सर्वदूर आयोजित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे’ अशा भावना शरद पवारांनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या.
बारामतीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर आज महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या रणजी सामन्याचे उद्घाटन करताना समाधान वाटले. प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देशांत सर्वदूर आयोजित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.#baramati #Cricket #RanjiTrophy pic.twitter.com/LOljSIMI8V
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 12, 2020
6 एप्रिल 2016 रोजी ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरच्या हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बीसीसीआयच्या समितीने बारामतीच्या मैदानाची पाहणी केली होती. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाला प्रथम श्रेणी सामन्यांचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर आता ‘बीसीसीआय’ने इथे रणजी सामने खेळण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील क्रिकेट चाहत्यांना प्रेरणा मिळणार आहे.
आगामी काळात आयपीएल, एकदिवसीय सामनेही बारामतीच्या स्टेडियम खेळवले जाण्याचे संकेत यावेळी शरद पवारांनी दिले आहेत. त्यामुळे नवोदित क्रिकेटपटूंना त्याचा निश्चितच फायदा (Baramati Stadium Ranaji Trophy) होणार आहे.