भारतीय संघाला मोठा धक्का, शिखर धवननंतर भुवनेश्वरही संघाबाहेर

भारतीय संघाला मोठा धक्का, शिखर धवननंतर भुवनेश्वरही संघाबाहेर

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला एक धक्का बसला. सामन्यादरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्याने सामन्याबाहेर गेला. शिखर धवननंतर भारतासाठी हा दुसरा झटका आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 17, 2019 | 10:12 AM

India vs Pakistan मँचेस्टर (इंग्लंड) : वर्ल्डकप 2019 मध्ये पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. रविवारी इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर आपला विजयरथ सुरुच ठेवला आहे. मात्र, या सामन्यात भारताला एक धक्काही बसला. सामन्यादरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्याने सामन्याबाहेर गेला. त्याची दुखापत गंभीर असून त्याला पुढील 2-3 सामन्यांमध्ये खेळता येणार नसल्याचीही माहिती मिळत आहे.

रविवारी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाचव्या षटकात गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे भुवेश्वरला आपले षटकही पूर्ण करता आले नाही. त्याच्याजागेवर विजय शंकरला गोलंदाजी करावी लागली. दरम्यान, भुवनेश्वरचे अर्धवट षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या विजयने आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली.

सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने भुवनेश्वर कुमारला पडल्याने दुखापत झाल्याचे स्पष्ट केले. कोहली म्हणाला, “भुवनेश्वर पडल्याने दुखापतग्रस्त झाला असून त्याला खेळण्यासाठी अडचण होत आहे. तो पुढील 2-3 सामने खेळू शकणार नाही, अशी शक्यता आहे. मात्र, तो लवकरच मैदानावर दिसेल, अशी आशा आहे.”

वर्ल्डकपदरम्यान, भारतासाठी हा दुसरा झटका आहे. याआधी भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनही हाताला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तो कधी संघात परत येणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. बीसीसीआयने (BCCI) शिखर धवनच्या जागेवर ऋषभ पंतला इंग्लंडला पाठवले आहे.

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात; भारताने आपली विजयी परंपरा कायम ठेवली. इंग्लंडमधील मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात (old trafford stadium) झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या टीम इंडियाने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने वर्ल्डकपमध्ये आपणच बाप असल्याचं दाखवून दिलं.

पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात; पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने टॉस जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. रोहित शर्माच्या खणखणीत 140 धावा; के. एल. राहुलच्या 57; कर्णधार कोहलीच्या 77 धावांच्या जोरावर भारताने 50 षटकात 5 बाद 336 धावा केल्या.

भारताच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांना पावसामुळे दोन वेळा पवेलियनमध्ये परतावे लागले. अखेर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे पाकिस्तानला सुधारित 40 षटकात 302 धावांचे आव्हान मिळाले. ते आव्हनही पाकला पेलवले नाही आणि पाकिस्तान 40 षटकांमध्ये केवळ 212 धावा करु शकला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें