T20i World Cup मध्ये 2 टीमसाठी खेळणारे 5 खेळाडू, एक क्रिकेटर भारत-न्यूझीलंड मालिकेचा भाग

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात 2 संघांकडून आतापर्यंत 5 खेळाडू खेळले आहेत. या 5 खेळाडूंमध्ये एक असा क्रिकेटर आहे जो सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात येत असलेल्या टी 20i मालिकेचा भाग आहे. जाणून घ्या.

T20i World Cup मध्ये 2 टीमसाठी खेळणारे 5 खेळाडू, एक क्रिकेटर भारत-न्यूझीलंड मालिकेचा भाग
Icc T20i World Cup 2026
Image Credit source: Icc
| Updated on: Jan 24, 2026 | 2:43 AM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला आता मोजून काही दिवस बाकी आहेत. या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं भारत आणि श्रीलंकेत आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. गतविजेता टीम इंडिया या स्पर्धेत ट्रॉफी कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आतापर्यंत कोणत्याच संघाला मायदेशात आणि सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकता आलेली नाही. अशात टीम इंडियाच्या निशाण्यावर हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांचं टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.

टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येक खेळाडूला संधी मिळतेच असं नाही. मात्र 5 खेळाडू हे असे आहेत जे 2 संघांकडून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळले आहेत. त्यापैकी 1 खेळाडू हा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी 20i मालिकेचा भाग आहे. त्या 5 खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात.

रोलॅफ व्हॅन डर मर्व्ह

रोलॅफ व्हॅन डर मर्व्ह या खेळाडूने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात 2 संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. या ऑलराउंडरने 2009 साली दक्षिण आफ्रिकेकडून कारकीर्दीची सुरुवात केली. रोलॅफ व्हॅन डर मर्व्ह 2009 साली दक्षिण आफ्रिकेकडून टची 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला. मात्र त्यानंतर रोलॅफ व्हॅन डर मर्व्ह नेदरलँड्ससाठी खेळायला लागला. रोलॅफ व्हॅन डर मर्व्ह याने 2022 आणि 2024 मधील टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सचं प्रतिनिधित्व केलं.

कोरी एंडरसन

कोरी एंडरसन न्यूझीलंड टीममधील प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. एंडरसनने 2016 साली टी 20i स्पर्धेत न्यूझीलंडचं नेतृत्व केलं होतं. मात्र त्यानंतर एंडरसन यूएसए टीमसह जोडला गेला. कोरी 2024 साली झालेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झाला होता.

डेव्हीड व्हीजे

रोलॅफ व्हॅन डर मर्व्ह याच्याप्रमाणे डेव्हीड व्हीजे दक्षिण आफ्रिकेसाठी खेळला आहे. डेव्हीड व्हीजे याने 2016 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र त्यानंतर डेव्हीड नामिबिया टीमसह जोडला गेला. डेव्हिडने 2021 आणि 2024 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत नामिबियाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

डर्क नॅनेस

डर्क नॅनेस 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला होता. त्यानंतर नॅनेसने मार्ग बदलला आणि नेदरलँड्सकडून खेळायला सुरुवात केली. नॅनेसने 2010 आणि 2014 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सचं प्रतिनिधित्व केलं होतं.

मार्क चॅपमॅन

मार्क चॅपमॅन 2014 आणि 2016 मधील टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत हाँगकाँगकडून खेळला. त्यानंतर चॅपमॅनने न्यूझीलंडकडून खेळायला सुरुवात केली. चॅपमॅन 2021, 2022 आणि 2024 टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडकडून खेळला. चॅपमॅन न्यूझीलंडच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. तसेच चॅपमॅन सध्या भारतात टीम इंडिया विरुद्ध खेळवण्यात येत असलेल्या टी 20i मालिकेचा भाग आहे.