
एसीसी मेन्स आशिया कप 2025 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात बी ग्रुपमधील इंडिया ए विरुद्ध ओमान हे 2 संघ आमनेसामने आहेत. ओमान आणि टीम इंडिया या दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना आहे. बी ग्रुपमधून आधीच पाकिस्तानने उपांत्य फेरीत धडक दिली. तर यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती संघाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीतील 1 जागेसाठी ओमान आणि इंडिया ए मध्ये यांच्यात चुरस आहे. ओमान आणि इंडिया ए ने आतापर्यंत 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर एका सामन्यात पराभूत व्हावं लागंल आहे. त्यामुळे आता इंडिया ए विरुद्ध ओमान यांच्यातील विजेता संघ बी ग्रुपमधून उपांत्य फेरीत पोहचणार आहे.
उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे दोहा येथील वेस्ट एन्ड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. भारतीय गोलंदाजांनी ओमनला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. ओमानने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 135 धावा केल्या. त्यामुळे आता इंडिया ए टीम हे आव्हान किती ओव्हरआधी पूर्ण करत सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कर्णधार जितेश शर्मा याच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. जितेशने ओमानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ओमानसाठी टॉप 4 फलंदाजांनाच दुहेरी आकडा गाठता आला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांसमोर एकालाही दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं नाही. दोघे आले तसेच परत गेले.
ओमानसाठी वसीम अली याने सर्वाधिक धावा केल्या. वसीमने 45 बॉलमध्ये नॉट आऊट 54 रन्स केल्या. वसीमने या खेळीत 1 षटकार आणि 5 चौकार लगावले. ओपनर आणि कॅप्टन हम्माद मिर्झा याने 200 च्या स्ट्राईक रेटने 16 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह 32 रन्स केल्या. नारायण साईशीव याने 16 धावांचं योगदान दिलं. तर विक्रोळीच्या करण सोनवळे याने 12 धावा केल्या.
इंडिया ए साठी गुरजनपीत सिंह आणि सुयश शर्मा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर विजयकुमार वैशाख, हर्ष दुबे आणि नमन धीर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान इंडिया ए टीमचा ओपनर वैभव सूर्यवंशी याने यूएई आणि पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या. वैभवने यूएई विरुद्ध 144 आणि पाकिस्तान विरुद्ध 45 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे आता वैभवकडून ओमान विरुद्ध विस्फोटक सुरुवातीची आशा असणार आहे.