Cricket | ‘टीमला मोठा झटका, दुखापतीमुळे टी 20 स्पेशालिस्ट स्पर्धेतून आऊट
Cricket News | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर विविध क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला लेजेंड्स क्रिकेट लीग सुरु आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे.

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या टी 20 मालिकेला आज 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही सूर्यकुमार यादव याच्याकडे आहे. तर मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियाची कॅप्टन्सी करणार आहे. पहिल्या टी 20 सामना हा विशाखापट्टणम इथे आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. त्याआधी दुसऱ्या बाजूने एक मोठी बातमी समोर आली आहे.
अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खान हा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. राशिद खान हा आगामी बिग बॅश लीगमधून बाहेर झाला आहे. दुखापतीच्या जाळ्यात फसल्याने राशिदला या स्पर्धेला बाहेर पडावं लागलं आहे. राशिद खान एडिलेड स्ट्रायकर्सकडून खेळण्यासाठी तयार होता. मात्र कंबरदुखीमुळे राशिदला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. एडीलेड स्ट्रायकर्ससने याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. आम्हाला या स्पर्धेत अखेरपर्यंत राशिदची उणीव जाणवेल असं एडीलेड स्ट्रायकर्स टीमने म्हटलंय.
राशिदच्या जागी कुणाला संधी?
राशिद बिग बॅश लीगमधून बाहेर झाल्याने आता त्याच्या जागी कुणाला संधी मिळणार, अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे. राशिदच्या जागी टीममध्ये कुणाला घेणार याबाबतही एडीलेड स्ट्रायकर्सकडून माहिती देण्यात आली आहे.
“राशिदला एडीलेड स्ट्रायकर्स टीमवर प्रचंड प्रेम आहे. राशिदला बिग बॅश लीग क्रिकेटमध्ये खेळायला किती आवडतं हे आम्हाला ठाऊक आहे. राशिदला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. राशिदला दीर्घकाळ क्रिकेट खेळायचं आहे. आमचा कोचिंग स्टाफ आगामी बिग बॅश लीग स्पर्धेसाठी राशिदच्या जागी कुणाला घ्यायचं याकडे लक्ष देऊन आहेत” अशी माहिती एडीलेड स्ट्रायकर्सच्या वतीने देण्यात आली.
राशिदचा वर्ल्ड कपमध्ये धमाका
दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत अफगाणिस्तान क्रिकेटने टीमने अफलातून कामिगिरी केली. अफगाणिस्तानने 9 पैकी 4 सामने जिंकले. अफगाणिस्तानने पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका या 3 विश्व विजेत्या संघांना पराभूत केलं. तसेच अफगाणिस्तानने वर्ल्ड कपमधील कामगिरीच्या जोरावर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी पहिल्यांदा क्वालिफाय केलं. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये पार पडणार आहे. राशिदने या वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 11 विकेट्स घेतल्या.
