
अफगाणिस्तान क्रिकेट संघाची चर्चा सध्या संपूर्ण जगभरात सुरु आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. अफगाणिस्तान संघाने टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये मजल मारली आहे. अफगाणिस्तानने आज सकाळी बांगलादेश विरोधातील सुपर 8 मधील शेवटच्या सामन्यात विजय मिळवला. या विजयामुळे अफगाणिस्तान संघाची एन्ट्री सेमीफायनलमध्ये झाली. अफगाणिस्तान संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेश संघाचा 8 धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा टी ट्वेन्टी वर्ल्ड कपमधील प्रवास पूर्णपणे संपला. अफगाणिस्तानला मिळालेल्या विजयानंतर संघाच्या कर्णधाराने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे धन्यवाद मानले आहेत. राशिदने इन्स्टाग्रामवर रोहित शर्मा सोबतचा फोटो शेअर करत खास पोस्ट केली आहे. या पोस्टची आता क्रिकेट प्रेमींमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे.
अफगाणिस्तान संघ सेमीफायनलमध्ये पोहोचण्यामागे टीम इंडियाचंदेखील अप्रत्यक्षपणे महत्त्वाचं योगदान आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात काल सुपर 8 मधील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने सुपरहिट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चारी मुंड्या चित केलं. त्याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळेच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या या कामगिरीमुळे अप्रत्यक्षपणे अफगाणिस्तान संघाचं काम देखील सेमीफायनलमध्ये येण्यासाठी सोपं झालं होतं. ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यामुळे आता अफगाणिस्तानला बांगलादेश विरूद्धच्या शेवटच्या सुपर 8 सामन्यात केवळ विजय मिळवायचा होता. तो विजय मिळवण्यात राशिद खानच्या संघाला यश मिळालं.
अफगाणिस्तान संघाच्या विजयानंतर कर्णधार राशिद खानने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट केली. राशिद खानने रोहित शर्मासोबतचा आपला खास फोटो शेअर करत टीम इंडियाचे धन्यवाद मानले. ‘बंबई से आया मेरा दोस्त… सेमीफायनल!’, असं कॅप्शन राशिदने रोहित सोबतच्या फोटोला दिलं.
यानंतर आता अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेमीफायनलचा सामना येत्या 27 जूनला होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 27 जूनला सकाळी 6 वाजेपासून सुरु होणार आहे. हा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-ट्वेन्टीचा इतिहास पाहिला तर हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात केवळ 2 सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचा पराभव झालाय. आता आगामी सामन्यात काय थरार बघायला मिळतो, याची क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.