…मला वाटलं सामना हातात आहे! पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने स्वत:च्या संघाची काढली लाज

भारताने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या घशातून विजयाचा घास खेचून आणला. याची कबुली पाकिस्ताना कर्णधार सलमान आघाने दिली. सामन्यानंतर बक्षीस समारंभात ही प्रतिक्रिया दिली.

...मला वाटलं सामना हातात आहे! पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने स्वत:च्या संघाची काढली लाज
...मला वाटलं सामना हातात आहे! पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने स्वत:च्या संघाची काढली लाज
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 29, 2025 | 2:33 AM

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम फेरीचा सामना अतितटीचा झाला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानने या सामन्यात 19.1 षटकात सर्व गडी गमवून 146 धावा केल्या. तसेच विजयासाठी 147 धावांचं आव्हान दिलं. पण मागच्या दोन पराभवाचा अनुभव गाठीशी असल्याने पाकिस्तानने भारताला विजयासाठी चांगलंच झुंजवलं. पॉवर प्लेमध्ये भारताने महत्त्वाच्या तीन विकेट गमावल्या. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून निसटत चालला आहे असं वाटलं. त्यानंतर प्रत्येक षटकानंतर चेंडू आणि धावांचं अंतर वाढत होतं आणि पाकिस्तानला विजयाची वाट सोपी वाटत होती. पण मधल्या फळीत खेळताना तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी पाकिस्तानच्या विजयाच्या आशेवर पाणी टाकलं. याबाबत कबुली पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने दिली. एक क्षण पाकिस्तानने हा सामना जिंकला असंच त्याला वाटत होतं.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा म्हणाला की, ‘पराभव गिळणे कठीण आहे. पण मला वाटते की आम्ही फलंदाजी चांगली केली नाही. पण गोलंदाजीत उत्कृष्ट होतो. आम्ही सर्वकाही दिले. पण आम्ही चांगले खेळू शकलो असतो तर गोष्ट वेगळी असती. मला वाटते की आम्ही स्ट्राईक योग्यरित्या रोटेट करू शकलो नाही. आम्ही झटपट विकेट गमावल्या. यामुळेच आम्ही आम्हाला हवे ते करू शकलो नाही. आम्ही लवकरच आमची फलंदाजी व्यवस्थित करणार आहोत.’

सलमान आघाने यावेळी भारतीय गोलंदाजांचं कौतुक केलं. इतकंच काय तर एक क्षण आम्ही सामना जिंकलो असंच वाटलं होतं. ‘मला वाटते की त्यांना 6 षटकांत 63 धावांची गरज होती. मला वाटले की सामना आमच्या हातात आहे. आमच्या गोलंदाजांनी खरोखर चांगली गोलंदाजी केली.मला एक संघ म्हणून खूप अभिमान आहे. आणि आम्हाला एक संघ म्हणून खूप अभिमान आहे. आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आम्ही सुधारणा करत राहू आणि आम्ही अधिक मजबूत होऊन परत येऊ.’ भारताने पाकिस्तानला आशिया कप स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा पराभूत केलं. तसेच जेतेपदावर नवव्यांदा नाव कोरलं आहे.