Video : बॅटमध्ये AI चिप असल्याचा आरोप, वैभव सूर्यवंशीने एका वाक्यात संपवला विषय

आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीचा झंझावात पाहून क्रीडाप्रेमी खूश आहेत. 15 वर्षीय खेळाडूची आक्रमक फलंदाजी पाहून अनेकांना विश्वास बसत नाही. अशा स्थितीत पाकिस्तानमधून अजब गजब विधान करण्यात आलं. वैभवच्या बॅटमध्ये चिप असल्याचं सांगितलं गेलं. त्यावर वैभवने उत्तर दिलं आहे.

Video : बॅटमध्ये AI चिप असल्याचा आरोप, वैभव सूर्यवंशीने एका वाक्यात संपवला विषय
Video : बॅटमध्ये AI चिप असल्याचा आरोप, वैभव सूर्यवंशीने एका वाक्यात संपवला विषय
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 29, 2026 | 6:42 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींचा नजरा टीव्ही, मोबाईलवर लागलेल्या असतात. कारण वैभव सूर्यवंशीचा आक्रमक बाणा सर्वांनाच माहिती झाला आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेण्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी तरबेज आहे. त्याने मागच्या काही सामन्यात स्फोटक फलंदाजी करून अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच दिग्गज गोलंदाजांना घाम फोडला आहे. जसप्रीत बुमराह, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड या दिग्गज गोलंदाजांना त्याने दिवसा तारे दाखवले आहेत. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचं नाव क्रीडाविश्वात चर्चेत आहे. इतकंच काय तर विदेशातही त्याच्या नावाची चर्चा आहे. शेजारी असलेल्या शत्रू राष्ट्रातही त्याच्या नावाने बोंब मारली जात आहे. पाकिस्तानात तर वैभव सूर्यवंशी बॅटमध्ये एआय चिप लावून खेळत असल्याचं बोललं जात आहे. त्या चर्चा ऐकून भारतात त्यांचं हासं होत आहे. आता वैभव सूर्यवंशीने एआय चिपवर आपलं उत्तर दिलं ाहे.

पाकिस्तानात क्रिकेट जाणकारांनी काहीही विधानं करण्यास सुरूवात केली आहे. क्रिकेट तज्ज्ञांचं म्हणणं ऐकून हसावं की रडावं असा प्रश्न आहे. त्याने सांगितलं की, हा तरूण फलंदाज बॅटमध्ये एआय चिप लावून तर खेळत नाही ना, कारण तो कोणत्याही मोठ्या गोलंदाजाला सोडत नाही. पाकिस्तानातील अशी विचित्र विधानं भारतीयांना काही नवीन नाहीत. पाकिस्तानचा हा इतिहास भारतीय क्रीडाप्रेमींना चांगलाच माहिती आहे. पण पाकिस्तानातून हे वक्तव्य मस्करीत आणि वैभवची स्तुती करण्यासाठी करण्यात आलं होतं. ही बाब आता वैभवपर्यंत पोहोचली असून त्याने त्याचं मजेशीर उत्तर दिलं आहे. पंजाब किंग्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्याला हा प्रश्न विचारला. तेव्हा वैभव म्हणाला की, ‘देवाने लावून दिली आहे. त्याने वरच सांगितलं होतं की तुझ्या बॅटमध्ये काही लावून देत आहे. त्याचाच वापर करत आहे.’

वैभव सूर्यवंशीने आयपीएल स्पर्धेतील 9 सामन्यात बॅटिंग केली. फक्त एका सामन्यात त्याला खातं खोलता आलं नाही. पण उर्वरित 8 सामन्यात त्याने 400 धावांचा पल्ला गाठला आहे. यात त्याने 1 शतक आणि दोन अर्धशतकं ठोकली आहेत. त्याने 44.44 च्या सरासरीने आणि 238 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. इतकंच काय तर षटकारांच्या यादीतही अव्वल स्थान गाठलं आहे. त्याने या स्पर्धेत एकूण 37 षटकार मारले आहेत. तर 34 चौकारांची नोंद केली आहे.

Follow Us