
Ben Stokes- Jofra Archer Fight: एशेज कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यातच मालिका गमवण्याचं संकट आता इंग्लंडवर आलं आहे. कारण या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने इंग्लंडने गमावले आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया 2-0 अशी आघाडीवर आहे. तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर पाच सामन्यांची कसोटी मालिका हातून जाईल. असं असताना या सुमार कामगिरीचं प्रभाव आता इंग्लंड संघावर दिसत आहे. त्याचा दबाव आता खेळाडूंवर स्पष्टपणे दिसून येत आहे. इंग्लंडचा कर्णधार आणि खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाईव्ह सामन्यात बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भिडल्याचं दिसत आहे. त्यामुळे इतर खेळाडूंना मध्यस्थी करणं भाग पडलं. एडिलेड कसोटीच्या दुसर्या दिवसाच्या खेळादरम्यान बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हायरल झालेला व्हिडीओ या सामन्यातील पहिल्या दिवसाचा आहे.जेव्हा ऑस्ट्रेलियाने 1 गडी गमवून 48 धावा केल्या होत्या.
व्हायरल व्हिडीओतील हावभाव पाहता हे भांडण स्टोक्स आणि जोफ्रामध्ये क्षेत्ररक्षणावर झाल्याचं दिसत आहे. आर्चरने स्टोक्सने लावलेल्या क्षेत्ररक्षणावर नाराजी व्यक्त केल्याचं दिसत आहे. त्याचीच तक्रार तो करत असल्याचं दिसत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी असा अंदाज बांधला आहे की, स्टोक्स त्याला सांगतोय की जेव्हा गोलंदाजी करत असतो तेव्हा क्षेत्ररक्षणाची तक्रार करू नको. स्टंपवर चेंडू टाकत जा. त्यानंतर आर्चरनेही आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्यामुळे हा वाद वाढत असल्याचं पाहून इतर खेळाडू मध्यस्थीसाठी धावले. त्यांनी स्टोक्स आणि आर्चर यांच्यातलं भांडण सोडवलं.डकेटने आर्चरचा राग शांत केल्याचं दिसत आहे.
Ben Stokes saying to Archer
Mate don’t complain about the field placings when you bowl 💩
“Bowl on the stumps” he says and yep and look what happens #ashes25@7Cricket #AUSvsENG pic.twitter.com/RFaoSnH02Z— Bernie Coen (@berniecoen) December 17, 2025
बेन स्टोक्सबरोबर भांडण झाल्यानंतर आर्चरचं रौद्र रूप पाहायला मिळालं. त्याने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या पाच खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. 2019 नंतर त्याला पहिल्यांदा मोठं यश मिळालं आहे. आर्चरने आपल्या गोलंदाजीतून स्टोक्सला उत्तर दिल्याचं आता बोललं जात आहे. दुसरीकडे, इंग्लंडने दुसऱ्या दिवशी 371 धावांचा पाठलाग करताना 213 धावांवर 8 विकेट गमावल्या आहेत. अजूनही इंग्लंड पिछाडीवर आहे. जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स मैदानात आहेत. जोफ्रा आर्चर नाबाद 30, तर बेन स्टोक्स नाबाद 45 धावांवर खेळत आहे. या दोघांमध्ये 45 धावांची भागीदारी झाली आहे. आता तिसऱ्या दिवशी कसा खेळ करतात याकडे लक्ष लागून आहे.