
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेत आमनेसामने आहेत. या सामन्याला आता काही मिनिटांचा अवधी बाकी आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला रविवारी 14 सप्टेंबरला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 30 मिनिटांआधी अर्थात साडे सात वाजता टॉस कोण जिंकणार? कुणाची बॅटिंग असणार? हे स्पष्ट होईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानतंर दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. या हल्ल्यानंतर सामना होत असल्याने भारतीयांकडून महामुकाबल्याला तीव्र विरोध केला जात आहे. या सामन्यावर बहिष्कार घालावा, असा ट्रेंड सोशल मीडियावर सेट झाला आहे. मात्र त्यानंतरही हा सामना होणार असल्याचं निश्चित आहे.
अलिकडे झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध कोणताही संबंध ठेऊ नये, अशा सामान्यांच्या भावना आहेत. मात्र त्यानंतरही हा सामना होतोय. सामन्याच्या वाढत्या विरोधामुळे भारतीय खेळाडूंमध्ये संभ्रम आहे. मात्र भारतीय खेळाडूंना सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
केंद्र सरकारने पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची परवानगी दिली आहे. आयसीसी आणि अशा बहुराष्ट्रीय स्पर्धेत खेळावं लागतं. त्यामुळे बीसीसीआय यात काहीच करु शकत नाही, असं म्हणत बीसीसीआयने एकाप्रकारे जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र खेळाडूंनी या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घ्यावा, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. ऐनवेळेस पाकिस्तान विरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला तर टीम इंडिया सुपर 4 मध्ये पोहचणार का? याबाबत जाणून घेऊयात.
आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी सहभागी संघाला साखळी फेरीत 3 पैकी 2 सामने जिंकायचे आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ ए ग्रुपमध्ये आहेत. या दोन्ही संघांनी या स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. भारताने यूएईला तर पाकिस्तानने ओमानवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता या दोन्ही संघांना एकमेकांविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून सुपर 4 मध्ये पोहचण्याची संधी आहे. मात्र पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला तरी टीम इंडिया सहज सुपर 4 मध्ये पोहचेल.
नियमानुसार, सुपर 4 साठी 2 सामने जिंकणं बंधनकारक आहे. भारताने आपल्या पहिलाच सामन्यात यूएई विरुद्ध 58 धावांचं आव्हान हे 27 चेंडूंमध्ये 1 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. भारताला 93 बॉल राखून विजय मिळवल्याचा फायदा नेट रनरेटमध्ये झाला. भारताचा नेट रनरेट हा +10.483 असा आहे.
टीम इंडियाला साखळी फेरीत पाकिस्तान व्यतिरिक्त ओमान विरुद्ध खेळायचं आहे. ओमान विरुद्ध विजय मिळवल्यास टीम इंडिया सहज सुपर 4 मध्ये पोहचेल. त्यामुळे टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला तरीही काहीही फरक पडणार नाही.
तसेच भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ सुपर 4 मध्ये पोहचल्यास उभयसंघात आणखी एक सामना होऊ शकतो. तसेच समीकरण जुळल्यास या दोन्ही संघात अंतिम सामनाही होऊ शकतो.