IND vs PAK : त्यामुळे आम्ही या सामन्याला…,भारत-पाक मॅचबाबत Bcci ची पहिली प्रतिक्रिया, काय म्हटलं?
BCCI Statement On Ind vs Pak : कुठे आंदोलनं तर कुठे निदर्शनं, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला देशवासियांकडून कडकडून विरोध केला जात आहे. मात्र हा सामना होणार असल्याचं निश्चित आहे. या सामन्याबाबत बीसीसीआयने काय म्हटलं? जाणून घ्या.

आशिया कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच भारत विरुद्ध पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघात होणाऱ्या सामन्याला विरोध केला जात आहे. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. तर 14 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आयोजित करण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे बहुतांश भारतीय चाहत्यांचा पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला टोकाचा विरोध आहे. मात्र त्यानंतरही हा सामना होत आहे. मल्टी नॅशनल स्पर्धा असल्याने भारताला या सामन्यात खेळण्यापासून रोखता येणार नाही. मात्र भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणार नाही, असं म्हणत केंद्र सरकारने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला हिरवा कंदील दिला. मात्र या सामन्याला चाहत्यांचा विरोध कायम आहे.
बीसीसीआयने हा सामना रद्द करावा, अशी तीव्र आणि आक्रमक मागणी देशवासियांची आहे. मात्र या सामन्याबाबत अंतिम निर्णय झाला आहे. त्यामुळे तीव्र विरोधानंतरही हा सामना होणार असल्याचं निश्चित आहे. या सामन्याला होत असलेल्या विरोधानंतर बीसीसीआयकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. बीसीसीआय सचिव देवजित सैकीया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बीसीसीआय सचिव काय म्हणाले?
“रविवारी होणाऱ्या सामन्यासाठी मी बीसीसीआय सचिव म्हणून आपल्या संघाला शुभेच्छा देतो. पाकिस्तान विरुद्ध विजयासाठी आपले खेळाडू पूर्ण ताकदीने उतरतील, असा मला आम्हाला विश्वास आहे. भारताला अशा संघाविरुद्ध खेळावं लागतंय ज्या देशासह फार चांगले संबंध नाहीत. मात्र बहुराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचं केंद्र सरकारचं धोरण आहे. त्यामुळे आम्ही या सामन्याला नकार देऊ शकत नाहीत”, असं बीसीसीआय सचिवांनी आज तक सोबत बोलताना म्हटलं.
माजी क्रीडा मंत्री काय म्हणाले?
दरम्यान या महामुकाबल्याला असलेल्या विरोधावर माजी क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी एएनआयला प्रतिक्रिया दिली. एसीसी (Asian Cricket Council) तसेच आयसीसी आयोजित स्पर्धेत क्रिकेट संघांना खेळणं अनिर्वाय असतं. तसं न केल्यास संघाला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागतं. तसेच प्रतिस्पर्धी संघाला गुण मिळतात. मात्र टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला आळा घालत नाही तोवर द्विपक्षीय मालिका होणार नाही”, असं माजी क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर म्हणाले.
