
क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे. एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेची ढाका येथे बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धेत 2 कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. स्पोर्ट्स तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बीसीसीआयने 23 जुलैला बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता आशिया कप स्पर्धा खेळवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी वाढला. दोन्ही देशातील वाढलेल्या संघर्षामुळे आशिया कप स्पर्धेच्या आयोजनाबाबत अनिश्चितता होती. मात्र आता या स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र बीसीसीआय किंवा एसीसीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
स्पोर्ट्स तकने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एसीसीच्या बैठकीत आशिया कप स्पर्धेबाबत चर्चा झाली. बीसीसीआय त्रयस्थ ठिकाणी स्पर्धेच्या यजमानपदासाठी तयार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे आहे. मात्र बीसीसीआय या स्पर्धेचं आयोजन यूएईमध्ये करण्यासाठी आग्रही आहे.
रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय आणि यूएई क्रिकेट बोर्डात आशिया कप स्पर्धेसाठी 3 स्टेडियम निश्चित झाले आहेत. मात्र फक्त 2 स्टेडियममध्येच सामने होणार आहेत. त्यानुसार दुबई आणि अबुधाबीत सामन्यांचा थरार रंगणार आहे. तसेच टीम इंडिया आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असतील, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र 7 ते 30 सप्टेंबरदरम्यान आशिया कप स्पर्धेचं आयोजन केलं जाऊ शकतं. मिळालेल्या माहितीनुसार, आशिया कप स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि एसीसी चेअरमन मोहसिन नकवी अंतिम निर्णय करतील.
आशिया कप 2025बाबत मोठी अपडेट
🚨 INDIA & PAKISTAN TO BE IN THE SAME GROUP FOR ASIA CUP 2025 🚨 [Sports Tak] pic.twitter.com/3A9LHm8vCr
— Johns. (@CricCrazyJohns) July 24, 2025
दरम्यान यंदा आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय करण्यात आला आहे. याआधी अखेरीस 2023 साली आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा वनडे फॉर्मटेनुसार आशिया कप स्पर्धा खेळवण्यात आली होती. तेव्हा पाकिस्तानकडे स्पर्धेचं यजमानपद होतं. मात्र हायब्रिड पद्धतीने स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.