
आशिया कप 2025 स्पर्धा सुरळीतपणे सुरु आहे. पहिल्या दोन सामन्यांचा खेळ संपला. पण चाहत्यांचा उत्साह काही दिसला नाही. पहिल्या दोन सामन्यात मैदान रिकामी दिसली. भारतासारखा दिग्गज संघ मैदानात असताना क्रिकेटप्रेमींनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यानेही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं. तसेच युट्यूब चॅनेलवर या संदर्भाचा पोस्टमार्टम केलं. आकाश चोप्रा म्हणाला की, ‘दुबईमध्ये भारत आणि युएई यांच्यात सामना खेळला गेला. पण आशिया कपच्या पहिल्या सामन्यात गर्दी कुठे आहे? असा प्रश्न आहे. सहसा असं म्हंटलं जातं की भारत चंद्रावरही क्रिकेट खेळला तरी लोक निळी जर्सी घालून तिथे पोहोचतील. पण या सामन्यातील दृश्य पूर्णपणे वेगळं होतं. मैदान जवळजवळ रिकामे होते आणि इतक्या दिवसांनी भारतीय संघ दुबईमध्ये खेळत होता आणि तरीही चाहते स्टेडियममध्ये उपस्थित नव्हते हे पाहून आश्चर्य वाटले. कोणत्याही क्रिकेटप्रेमीसाठी हे एक विचित्र दृश्य होते.’
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, ‘यामागील एक प्रमुख कारण म्हणजे स्पर्धेचा प्रचाराचा अभाव मानता येईल. दुबईमध्ये क्रिकेटचा अतिरेक झाला असण्याची शक्यता आहे. येथे ILT20 आणि इतर अनेक स्पर्धा देखील खेळल्या गेल्या आहेत. तिकिटांच्या किमती जास्त असण्याची शक्यता आहे किंवा स्थानिक पातळीवर प्रचाराचा अभाव असण्याची शक्यता आहे. आगामी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी लोक नक्कीच जमतील, परंतु इतर सामन्यांसाठी चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखावी लागेल. अन्यथा गर्दी कुठे आहे हा प्रश्न नेहमीच राहील.’ दुसरीकडे, सामन्यादरम्यान स्टँड रिकामे असण्याचे कारण सोशल मीडियावर सुरू असलेली ‘बहिष्कार आशिया कप’ मोहीम असल्याचे मानले जात आहे.
दुबईतील एका व्यावसायिकाने आशिया कप स्पर्धेसाठी 700 तिकिटं विकत घेतली आहे. अर्थात पॅकेज पॅटर्न असल्याने सात सामन्यांची तिकीटे आहेत. ही तिकीटे त्यांनी कर्मचाऱ्यांना फुकट दिली. डॅन्यूब ग्रुपचे उपाध्यक्ष अनीस साजन यांनी सांगितलं की, ब्लू-कॉलर कर्मचाऱ्यांमध्ये ही तिकिटे वाटली जात आहेत. त्यामुळे या कर्माचाऱ्यांना थेट मैदानात सामन्यांचा अनुभव घेता येणार आहे. पॅकेजमधील 100 तिकिटे ही भारत पाकिस्तान सामन्यांची आहेत.