
टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीला शनिवार 20 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. सुपर 4 मधील पहिल्याच सामन्यात बी ग्रुपमधील संघ आमनेसामने असणार आहेत. श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. चरिथ असलंका याच्याकडे श्रीलंकेच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर लिटन दास बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडणार आहे.
साखळी फेरीप्रमाणे सुपर 4 मध्येही पात्र ठरलेल्या संघांना प्रत्येकी 3 सामने खेळायचे आहेत. श्रीलंकेने साखळी फेरीत तिन्ही सामने जिंकले. श्रीलंकेने हाँगकाँग, बांगलादेशनंतर अफगाणिस्तानला पराभूत केलं. श्रीलंकेने बी ग्रुपमधील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानवर मात केल्याने बांगलादेशला सुपर 4 फेरीत प्रवेश मिळाला. श्रीलंकेने एकाप्रकारे बांगलादेशवर उपकारच केले. त्यामुळे बांगलादेश या उपकारांची जाणीव ठेवणार की साखळी फेरीतील पराभवाचा वचपा काढणार? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
श्रीलंकेला रोखण्याचं बांगलादेशसमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे. श्रीलंकेने साखळी फेरीत तिन्ही सामने जिंकलेत. त्यामुळे श्रीलंका बांगलादेश विरुद्ध सलग चौथ्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. तर बांगलादेशसमोर दुहेरी आव्हान असणार आहे. बांगलादेशसमोर साखळी फेरीतील पराभवाची परतफेड करण्यासह सुपर 4 मध्ये विजयी सुरुवात करण्याचं आव्हान आहे.
श्रीलंकेने बांगलादेशवर 13 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला होता. बांगलादेशने विजयसाठी दिलेलं 140 धावांचं आव्हान श्रीलंकेने 31 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं होतं.
सुपर 4 फेरीतील पहिल्या सामन्यात कोण करणार विजयी सुरुवात?
Super Four | Match 1 ⚔️
Arch-rivals Sri Lanka & Bangladesh kick off proceedings in the Super 4️⃣ stage, reigniting the 🔥 in a high-stakes clash.#SLvBAN #DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/23CNazFinu
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 20, 2025
दरम्यान श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दोन्ही संघ टी 20i फॉर्मेटमध्ये एकूण 21 वेळा आमनेसामने आले आहेत. श्रीलंकेने 21 पैकी सर्वाधिक सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे. श्रीलंकेने बांगलादेश विरुद्ध 21 पैकी 13 टी 20i सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर बांगलादेश क्रिकेट टीमला 8 वेळा पलटवार करता आला आहे. त्यामुळे आता उभयसंघातील 22 व्या टी 20i सामन्यात कोण विजय मिळवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.