दावोसमध्ये एका दिवसात 1 लाख कोटींचा करार, फडणवीसांनी सांगितला पेन-रायगड स्मार्टसिटीचा मेगा प्लॅन!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील नव्या स्मार्ट सिटीबाबत महत्त्वाची माहिती दिली.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात ते जगभरातील गुंतवणूकदारांशी चर्चा करून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी सामंजस्य करार घडवून आणत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक कंपन्यांशी सामंजस्य करार झालेले असून भविष्यात या कंपन्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहेत. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. दरम्यान, दावोसमध्ये असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. आपल्या या मुलाखतीत त्यांनी आतापर्यंत झालेले करार आणि महाराष्ट्रात होत असलेल्या गुंतवणुकीबद्दल सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी पेन-रायगड येथे भविष्यात होणाऱ्या स्मार्टसिटीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
पीपीपी तत्वावर उभी राहणार स्मार्ट सिटी
यावेळी दावोसमध्ये आपण गेल्या वर्षाच्या गुंतवणुकीचे सर्व रेकॉर्ड मोडणार आहोत. पण दोन महत्त्वाच्या गोष्ट मला सांगायच्या आहेत. 20 जानेवारी आपण एक सामंजस्य करार केला आहे. हा करार पेन-रायगड स्मार्टसिटीसंदर्भात आहे. पेन रायगड स्मार्टसिटी ही नवी मुंबईच्या विमानतळापासून 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. ही पीपीपी पद्धतीने तयार होणारी पहिली स्मार्टसिटी आहे. यामध्ये खासगी लोक आणि एमएमआरडीए एकत्र आलेले आहेत, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
9 गुंतवणूकदार 1 लाख कोटींची गुंतवणूक
तसेच पुढे बोलताना या स्मार्टसिटीच्या सगळ्या परवानग्या मिळाल्या आहेत. या स्मार्टसिटीसाठी जवळपास 9 गुंतवणूकदारांनी 20 जानेवारी रोजी 1 लाख कोटी रुपये गुंतवण्याचा सामंजस्य करार केला आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. हे गुंतवणूकदार सिंगापूर, यूएस, दुबई, यूएई नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया येथील असल्याचे सांगत पेन-रायगड स्मार्टसिटीच्या रुपात एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार होत आहे. आपण नवी बिकेसी तयार करण्याचा प्रयत्न करत प्रयत्न असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आणखी बरेच सामंजस्य करार होणार
दरम्यान, फडणवीस दावोसमध्ये असताना आणखी काही महत्त्वाचे सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येणार असून त्याचा महाराष्ट्राला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.
