
टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेची दणक्यात सुरुवात झाली. अफगाणिस्तानने स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात विजयी सुरुवात केली. अफगाणिस्तानने 9 सप्टेंबरला हाँगकाँगवर 94 धावांनी मात करत पहिला विजय मिळवला. अफगाणिस्तानचा हा टी 20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील एकूण पाचवा विजय ठरला. त्यानंतर स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध यूएई यांच्यातील सामना हा 10 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या निमित्ताने भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानात किती टी 20i सामने खेळले आहेत? याबाबत जाणून घेऊयात.
भारतीय संघाने आतापर्यंत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये एकूण 10 टी 20i सामने खेळले आहेत. भारताची या मैदानातील विजयी टक्केवारी ही 60 आहे. भारताने या मैदानात 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत.
भारताने दुबईत एकूण 5 संघांना पराभूत केलंय. तसेच भारताने या मैदानात पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक सामने जिंकले आहेत. भारताने दुबईतील या स्टेडियममध्ये पाकिस्तान विरुद्ध दोन्ही सामने जिंकले आहेत. त्याव्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलँड, नामिबिया आणि हाँगकाँग विरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. तर भारताला 4 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय.
यूएई विरुद्ध भारत दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ ठरणार आहे. याआधी उभयसंघात एकमेव टी 20i सामना खेळवण्यात आला होता. भारताने हा सामना एकतर्फी फरकाने जिंकला होता. भारताने यूएईवर 9 विकेट्सने मात केली होती. तसेच दोन्ही संघ एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 वेळा आमनेसामने आले होते. भारताने या तिन्ही सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे आकडेवारी पाहता टीम इंडिया सरस आहे.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध यूएई यांच्यातील सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांन टॉस होईल. हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्टस नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.
दरम्यान शुबमन गिल याचं अनेक महिन्यांनी टी 20I संघात कमबॅक झालं आहे. भारतासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे दोघे ओपनिंग करतात. मात्र शुबमनच्या कमबॅकमुळे संजूच्या बॅटिंग पोजिनशमध्ये बदल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच संजूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आता या दोन्ही प्रश्नांची उत्तर काही तासांतच मिळतील.