UAE vs Oman: कॅप्टन मुहम्मद वसीमची स्फोटक खेळी, यूएईचा दणदणीत विजय, ओमानचा 42 धावांनी धुव्वा
Asia Cup 2025 UAE vs Oman Match Result : होम टीम यूएईने करो या मरो सामन्यात ओमानवर मात करत विजय मिळवला आहे. यूएईच्या विजयात कॅप्टन मुहम्मद वसीम याने प्रमुख भूमिका बजावली.

आशिया कप 2025 स्पर्धेतील सातव्या सामन्यात ए ग्रुपमधील आणखी एका संघाने विजयाचं खातं उघडलं आहे. टीम इंडिया, पाकिस्ताननंतर आता यजमान यूएईने या स्पर्धेतील पहिलावहिला विजय मिळवला आहे. स्पर्धेतील सातव्या सामन्यात यूएई विरुद्ध ओमान आमनेसामने होते. यूएईने ओमानवर मोठ्या फरकाने मात करत या स्पर्धेतील आव्हान कायम राखलंय. कॅप्टन मोहम्मद वसीम, आलिशान शराफू आणि जुनैद सिद्दीकी या तिघांनी यूएईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.
कॅप्टन मोहम्मद वसीम आणि आलिशान शराफू या सलामी जोडीने अर्धशतकी खेळी केली. तसेच इतरांनी योगदान दिलं.यूएईने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 172 धावा केल्या. तर ओमानला 173 धावांच्या प्रत्युत्तरात सर्वबाद 130 धावाच करता आल्या. यूएईला 130 वर रोखण्यात जुनैदने निर्णायक भूमिका बजावली. जुनैदने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. यूएईने अशाप्रकारे 42 धावांनी विजय मिळवला. तर ओमानचा हा एकूण आणि सलग दुसरा पराभव ठरला.
पहिल्या डावात काय झालं?
ओमानने टॉस जिंकून यूएईला बॅटिंगची संधी दिली. यूएईच्या सलामी जोडीने याचा चांगलाच फायदा घेतला. मुहम्मद वसीम आणि आलिशान या दोघांनी कडक सुरुवात केली. या दोघांनी ओमानच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी 88 धावांची सलामी भागीदारी केली. आलिशान याने 38 बॉलमध्ये 7 फोर आणि 1 सिक्ससह 51 रन्स केल्या.
कॅप्टन मुहम्मद याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. मुहम्मदने 54 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 फोरसह 69 रन्स केल्या. मुहम्मद रन आऊट झाल्याने त्याच्या खेळीला ब्रेक लागला. या दोघांव्यतिरिक्त मुहम्मद झोहेब याने 21 धावांचं योगदान दिलं. तर हर्षित चोप्रा याने नाबाद 19 धावा केल्या. यूएईने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 172 धावा केल्या. ओमानसाठी जितेंद्र रामनंदी याने 2 विकेट्स मिळवल्या. तर हसनैन शाह आणि समय श्रीवास्तव या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
ओमानचं पॅकअप
ओमानला विजीय धावांचा पाठलाग करताना पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. यूएईने ओमानला 18.4 ओव्हरमध्ये 130 वर गुंडाळलं. ओमनानसाठी फक्त तिघांनाच 20 धावांपर्यंत पोहचता आलं. तर दोघांना 10 पेक्षा अधिक धावा जोडता आल्या नाहीत. यूएईने या 5 फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखलं. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. यूएईसाठी जुनैद व्यतिरिक्त हैदर अली आणि मुहम्मद जवादुल्लाह या दोघांनी विकेट्स घेतल्या. या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मुहम्मद खान याने 1 विकेट मिळवली.
